साहित्य,संस्कृती,इतिहास,समीक्षा,ग्रंथपरिचय,चरित्रात्मक व वैचारिक लेख,प्रवास वर्णन,स्थळसमीक्षा,टिका,शब्दचित्रे इ.
शुक्रवार, 26 जून 2020
शिवनेरीवरील बौद्ध लेणी
सोमवार, 22 जून 2020
चौक आणि चौकट
![]() |
| Add captioअनंत खासबारदारn |
लालसर रंगाच्या पार्श्वभूमीवर एक काळ्या रंगाचा गरुड, त्याखाली एक चौरस त्यात हिरवा, लाल, जांभळा अशा रंगांच्या छटा, फटकारे... काहीसं अब्स्ट्रॅक्ट .. पांढऱ्या व काळ्या अक्षरात पुस्तकाचं शीर्षक.. ' चौक आणि चौकट '. प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट आणि त्यांचाच ब्लर्ब.. आणि कवी म्हणजे चक्क जाहिरात क्षेत्रातले मोठे नाव,कमर्शियल आर्टिस्ट अनंत खासबारदार...!ज्यांनी 'स्वच्छ भारत अभियान'चा लोगो बनवला, भालचंद्र नेमाडे यांच्या 'चांगदेव चतुष्ट्य' ची मुखपृष्ठं बनवली असे प्रतिभावंत चित्रकार..
पॉप्युलर या विख्यात प्रकाशनसंस्थेने काढलेल्या या संग्रहात एकूण १०८ पृष्ठे व तितक्याच कविता आहेत. राष्ट्राला अर्पण केलेल्या या संग्रहात दुसऱ्याच पानावर
निसटून जातो जसा पारा
तसा जगलो रोज इथे
झूल रोज नवीच तरीही
मागत गेलो दान इथे
या ओळी आपले लक्ष वेधून घेतात आणि एकूणच कवितांची जातकुळी लक्षात येते. जगणेच पाऱ्यासारखे असल्याने ते शब्दात पकडणे अशक्यच.. जगताना पांघराव्या लागलेल्या झूली रोज नव्याच असल्या तरी दान मागणे जुनेच आहे. वेगवेगळ्या भूमिका निभावताना साकल्य आणि साफल्याचे दान मागत राहण्याचे भागधेय ठरुन गेले आहे. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधणारी, आत्मशोधाच्या वाटेने जाणारी ही कविता आहे.
हा अर्थ लावताना वारशात मिळालेल्या संचितांचा अन्वय लावताना 'त्या ' शक्तीशी संवाद होतो.. एवढे सगळे असूनही ओढ लागली आहे ती हव्यासपलीकडचे मिळवण्याची.. त्यामुळे साधने हाताशी असूनही काहीच सापडत नाही अशी अवस्था झाली आहे, हे सांगताना कवी प्रार्थना करतात -
आता जे हवंय, हव्यासापलीकडचं
तेही तूच दे...
या पसाऱ्यात हरवलेली एक जागा;
तुला भेटण्याची... शांतपणे (पृ.१)
जगाच्या पाठीवर अगतिक, दुर्बल जीव आढळतात. पाण्याअभावी सुकलेले झाड ; तहानलेले जीव;पाणी ताब्यात असलेल्या बलदंड आसाम्या;चिरडले जाणारे चिमुकलो जीव;रुग्ण शय्येवरच्या अगतिक रुग्ण आणि ज्यांच्यासाठी आपण परके आहोत अशा सर्वसामान्यांसाठी कवी प्रार्थना करतात. ज्यांच्यासाठी प्रार्थना करणारे कुणीच उरलेले नाही अशा सर्वांसाठी काहीच करता येत नसेल तर किमान प्रार्थना करायची बांधिलकी मानणारा हा कवी आहे. संवेदनशीलता कमी झाल्याचे शल्य घेऊन, संवेदनांच्या काहूरात कवीने ' मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेन ' ही कविता लिहिली असल्याचे जाणवते...
' जळालेले मंत्रालय ' ही कविता मागच्या शासनाच्या काळात मंत्रालयाला लागलेल्या आगीवरचे राजकीय परंतु भाष्य आहे -
जळालेल्या त्या साऱ्या फाइल्समधून एक कागद वाचला होता...
दूरवरच्या खेडेगावातून आलेला एक अर्ज तेवढा
उरला होता....
जळून गेलेल्या मुलीच्या खुनाची तक्रार..
किंवा पोट जाळता जाळता रस्त्याकडेला अपघातात
गेलेल्या म्हाताऱ्याचा तपास,
गावाबाहेर जळालेल्या वस्तीतले आक्रोश,
आणि फटाक्यांच्या फॅक्टरीच्या आगीत होरपळलेलं बालपण...
वणव्यात भस्मसात झालेल्या अधिकाऱ्यांच्या कहाण्या...
आणि पेट्रोल माफियांनी जाळलेले देह,
कोणता तरी एक अर्ज जिवंत होता..
मंत्रालयावर नुकत्याच लावलेल्या राजमुद्रेतील
एक सिंह दुःखी होता..
द्दष्टी अधू असल्याने त्याने वाचला तो अर्ज...
अन् भिंतीवरची अक्षरं वरुन उलटी...
सत्यमेव जळते !
सामाजिक विषमता आणि राजकीय अनास्था यावरची सणसणीत चपराक खासबारदार ताकदीने लगावतात.
" त्या पहाटे ' या कवितेत पहाटेच्या तरलपणा सोबत एकाकीपणा ते चित्रित करतात. परस्परविरोधी मानसिक आंदोलनांना कवी खासबारदार खुबीने चितारतात. म्हणजे त्यांच्या कवितेत एकाच वेळी संवाद लय आणि विरोध लय आढळते. कधी हा संवाद स्वतःचा स्वतःशी तर कधी समष्टीशी चालू असतो. विरोध लय साकारताना ते स्वतःची अगतिकता भोवतालच्या कडूझार वास्तवाच्या पार्श्वभूमीवर मांडतात. सभोवतालचे दैन्य, दुःख, विपरीत वास्तव त्यांच्या संवेदनशील मनावर चरे उमटवते. या दृष्टीने त्यांच्या 'भुकेचा श्लोक, ' ' वादळ भोवरा ' , ' दुःखाचे हुंकार ' , ' जुना डाग ' , 'दुष्काळ ' , 'स्तवनदरबारी ', 'काँक्रीट जंगलात ' , 'चिंता आणि चिता','मोनालिसा', ' प्रहर ' अशा अनेक कविता दाखवता येतात.
ते चित्रकार असल्याने त्यांच्या कवितेतही हे रंग शब्दांच्या सोबत येतात. उदा. कविता व त्यातील रंग -
प्रार्थना - शुभ्र
शाप - आकाशी
जळालेले मंत्रालय - आग (नारंगी, पिवळा, लाल )
त्या पहाटे - शुभ्र
रंग - इंद्रधनुषी
सैरभैर - पांढरा, काळा, कर्दळी
भुकेचा श्लोक - पांढरा
काय करु -हिरवा
आठवणींचा नाग व शाई सती जाताना - शाई
कारखाना - लाल,निळसर व कळकट
' रंगीत सूज ' या कवितेत तर रंग आणि सेलिब्रेटींचा संबंध उलगडून दाखवला आहे. खासबारदार यांच्यातला चित्रकार दिसतो तो असा..
त्याचप्रमाणे कवीच्या अभिव्यक्तीचे दोन स्तर दाखवता येतात. एक जनभाषेचा स्तर तर दुसरा सूचकतेचा स्तर. जनभाषेच्या स्तरातील अभिव्यक्ती ही सर्वसामान्यांच्या भाषेत थेटपणे होते.तर सूचकतेच्या स्तरातील कविता प्रसंगी भयसूचन तर अर्थाच्या अनेक शक्यता अधोरेखित करताना दिसतात.पहिल्या प्रकारच्या कवितांमध्ये 'सूर्य राहू दे तरी ','हजार पावलांवर','काय करू', 'बायोडेटा','कारण..राजकारण..'सारख्या कविता दाखवता येतात.
कालच्या दि. २१ जून च्या मटाच्या अंकात हा लेख
गुरुवार, 18 जून 2020
पेमगिरी येथील विशाल वटवृक्ष
आशिया खंडातील दोन नंबरचा विशाल वटवृक्ष
' नेर ' या शब्दाचा अर्थ होतो 'गांव '. अहमदनगर जिल्हयातील 'संगमनेर ' या तालुक्याच्या गावाच्या नावाचा अर्थ होतो - संगमावरील गाव. हे तालुक्या चे गाव प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
या तालुक्यातील पेमगिरी हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव आहे. डोंगरदऱ्यांतून वाहणारे निर्झर आणि घनदाट वनराईमुळे गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. ऐतिहासिक
पेमगिरी किल्ला आणि महाकाय वटवृक्ष हा पेमगिरीकरांचा अमूल्य ठेवा आहे. भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड कोलकात्याला आहे. त्यानंतर पेमगिरीच्या वटवृक्षाचा क्रमांक लागतो. सुमारे अडीच ते तीन एकरांच्या परिसरात या झाडाचा विस्तार झाला आहे. वाढलेल्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या, की त्यालाच मुळे फुटून नवीन झाड जन्म घेते. अशा शेकडो पारंब्या जमिनीत रुजून हा विशाल वटवृक्ष वर्षांनुवर्षे दिमाखात उभा आहे.
झाडात झाड वडाचे झाड! हा वंश वटवृक्ष. वंशवृद्धीसाठी या झाडाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, इतकेच नव्हे तर, या झाडापासून वातावरणात पसरणारी शक्ती व वायू यांचा शरीरावर परिणाम होतो म्हणूनही काही संस्कार-व्रते प्रचलित आहेत. सध्या हिरवळीचे खूप महत्त्व आहे. बागबगीचे, जंगले वाढवावीत असा खूप प्रचारही होतो आहे. परंतु लोकांच्या मनात झाडाच्या श्रेष्ठतेविषयी श्रद्धा वाढल्याशिवाय या उपक्रमाला खरी साथ मिळणे अवघड राहील. वटपौर्णिमेच्या पूजेसारखे उत्सव ( पण पुराणातले चमत्कार टाळून ) वैज्ञानिक पद्धतीने याचा प्रचार करून अवश्य वाढवावेत व पर्यावरणरक्षणाला मदत करावी. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे.
गवताची व दर्भाची पाती असोत, जंगलातील दोनदोनशे फूट वाढणारी झाडे असोत, झाडाच्या खोडातून अख्खी मोटर जाऊ शकेल एवढे मोठे खोड असलेली झाडे असोत किंवा वटवृक्षासारखे झाड असो, एकूण प्राणिमात्राची व जिवाची उत्क्रांती वनस्पतीपासून होते. वनस्पतीतील उत्क्रांती वडाच्या झाडाच्या ठिकाणी पूर्ण झाली. पुढे सजीव, हिंडणारे-फिरणारे प्राणी सुरू होतील असे हे पूर्णत्व सुचविणारे वडाचे झाड.
वनस्पती सजीव असतात व त्यांच्यात प्राण असतो, पण त्या एकाच जागी राहतात. प्राण कार्यान्वित होऊन भूमीपासून अलग होणारे किंवा एका स्थानाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे प्राणी उत्क्रांत झाले याची गोष्ट समजावी म्हणून की काय, सावित्रीने वडाच्या झाडाखाली पूजा करून आपल्या पतीला प्राण देऊन जिवंत केले ही कथा प्रचलित असावी.
वडाचे झाड आयुर्वेदात खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. साल, मुळ्या, पारंब्या वगैरे वटवृक्षाच्या सर्व भागांचा उपयोग होतो. जीवनचक्र सुरू राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पुनरुत्पत्तीसाठी वडाच्या झाडाचा खूप उपयोग होतो. नवांकुरांचा रस नाकात टाकायचा असो, एकूणच वीर्य वाढविण्यासाठी असो किंवा गर्भाशयाच्या शुद्धीसाठी असो, वडाच्या झाडाचा उपयोग होतोच.
वडाच्या झाडाची एक गंमत अशी की ते लावावे लागत नाही. ते कुठे, कसे व केव्हा उगवेल हे सांगता येत नाही. वनस्पती लावा, हिरवळ लावा, वृक्षतोड थांबवा, सेंद्रिय शेती करा, अमुक खत वापरा, तमुक खत वापरू नका, जमिनीची मशागत अशी करा, अमुक प्रकारचे बियाणे वापरा असा खूप प्रचार झाला व त्याचे शिक्षण दिले तरी झाडे वाढवता येतीलच असे नाही. त्या उलट अचानक घराच्या भिंतीतून एक वडाचे झाड उगवलेले दिसते. वडाच्या झाडाची एक काडी नव्हे तर एक पान जरी जमिनीत खोवले तरी त्याचा वृक्ष होतो असे म्हणतात.
शेजारच्याच्या व आपल्या शेतजमिनीच्या सीमा नीट कळाव्यात म्हणून बांधावर वडाच्या फांद्या खोचल्या जातात. वडा-पांगाऱ्याच्या सरळ काड्या वापरून भाजीपाल्यासाठी लागणारा सुंदर मांडव उभारता येतो, शिवाय ह्या कामाला एक पैसाही खर्च होत नाही. मांडव उभारताना काड्या एकमेकाला बांधण्यासाठी वडाच्या पातळ पारंब्या उपयोगाला येतात. लावलेल्या वाळक्या काड्यांना पाने फुटून पुढे मोठी झाडे झालेलीही दिसतात.
पेमगिरीच्या वडाच्या पायथ्याशी गावकऱ्यांनी जाखमतबाबा,जाखाई यांच्या मूर्ती आहेत. त्यामागे एक कथा आहे त्यामुर्ती मध्ये जाखमतबाबा, त्याची बहीण जाखाई,एक वाघ व एक कुत्रा आहे. गावकऱ्यांच्या तोंडून ऐकलं तर असं कळत की, "एकदा जाखमतबाबा तो शेळ्या चरायला न्यायचा तेव्हा त्याची शेळी वाघाने पकडली म्हणून त्या बाबाने त्या वाघाला ललकारलं त्यामुळे त्याच्यावर वाघाने हल्ला केला तेव्हा त्या जाखमतबाबाने आपल्या हातातली कुऱ्हाड वाघाच्या डोक्यात घातली अशी त्यांची झटापट पेमगिरी गडावरून खालपर्यंत येऊन थांबली तेव्हा सोबत असलेला कुत्रा त्या वाघाचे लचके तोडत होता संध्याकाळची वेळ असल्याने त्या जाखमतबाबाची बहीण जाखाई त्याला शोधत निघाली असता रक्ताच्या डागावरून ती वडापर्यंत येऊन पोचली व तिला दिसलं की भाऊ मृत्यमुखी पडला आहे तिला दुःख अनावर झालं आणि तिने हातातला पाण्याचा गडवा डोक्यात मारून स्वतः स्वतः प्राण सोडला" अशी कहाणी ह्या मूर्तीची. म्हणून आजही ह्या वडाखाली असलेल्या ह्या मूर्तीची लोक मनोभावे पूजा करतात.
भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. तसेच पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेला वटवृक्षही सुमारे दिड एकर परिसरात पसरलेला आहे.
मात्र पेमगिरी येथील हा विशाल वटवृक्ष तीन एकरात पसरलेला असून त्याच्या अजून काही पारंब्या जमिनीला टेकून खोड बनण्याची प्रक्रिया चालू आहे. ज्यांच्या जमिनीत हा वृक्ष आहे त्यांनी आपले उर्वरित शेत आता या वडासाठीच राखून ठेवले आहे.
संगमनेर पासून २४ कि मी अंतरावर हा वटवृक्ष आहे. शहाजीराजे, बाजीराव मस्तानीच्या वास्तव्याने प्रेरित झालेला प्रेमगड उर्फ शहागड उर्फ पेमगिरी च्या किल्ल्याच्या मागे हा सुमारे दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचा वड आहे. या वडाच्या बाजूलाच मोरदरा आहे.सीताफळाची विपुल झाडे असणारा हा परिसर आवर्जून पहावा असाच आहे.
- डॉ.सं ज य बो रु डे,
२१ अ , अमन, गोविंदपुरा, एकता कॉलनी, अहमदनगर,४१४००१.
मो.९४०५००० २८०






















