गुरुवार, 30 अप्रैल 2020

सुधीर देवरे यांना एक अनावृत्त पत्र -राकेश वानखेडे








मा. सुधीर देवरे सर,
             नमस्कार,
               आपली गोष्टीत मावत नाही ही कादंबरी नुकतीच वाचून संपवली .अत्यंत पारदर्शी असं निवेदन हे या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. कोणताही आडपडदा न ठेवता ती सहजपणे चित्ररूपी होते. खूप दिवसांपूर्वी मी  फ्योदर दस्तोवस्की यांची भूमिगत ( नोट्स फ्रॉम  अंडरग्राउंड )नावाची एक लघु कादंबरी वाचली होती. त्यातला वास्तवदर्शी आणि स्वयम् अंर्तचित्रणाचा अत्यंत विलक्षण असा तटस्थ प्रयोग एकोणिसाव्या शतकात रशियन साहित्यविश्वात केला गेला. खरं म्हणजे महाराष्ट्राने हा तटस्थतेचा नव्हे तर फक्त वास्तव चित्रणाचा दस्तवस्की याचा गुण घेतला .आणि स्वतःला मात्र लेखकाने चिकित्सेत पासून लांब ठेवले . परंतु आपण या कादंबरीत स्वतः ' स्व ' झोडपून काढताना दिसतात. आत्मटीकेचे हत्यार अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने चाललेलं दिसतं.आपल्या आयुष्याचा कफल्लकपणा आणि आपण करत असलेल्या अनेक निरर्थक गोष्टींचा आपण धांडोळा घेत एक प्रकारे माणसाच्या जगण्यातले एक जे एकाकीपण असतं,ज्याला निरर्थकता किंवा ज्याला आपण जीवनाची नश्वरतासुद्धा म्हणू शकतो, ती अत्यंत ताकदीने या ठिकाणी मांडली आहे.
               आपल्या आसपास अनेक गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे चालत नाहीत, हे स्वीकारणारा नायक जरी साऱ्याच गोष्टींविषयी त्रागा करत असला, तरीसुद्धा तो आपल्या - आपल्या परीने मूल्य सांभाळून जगणारा आहे. तो कोणावरही ओरखडे उडत असला तरी, त्याची म्हणून एक मूल्यव्यवस्था आहे आणि ती खूपच गुणात्मक आहे. त्यामुळे व्यवस्थेचा प्रचार करणे हे त्याचे सेंद्रिय ब्रीद आहे असे दिसते. खरं म्हणजे हेच आपल्या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणता येईल.आजपर्यंत लिटिल मॅगझिनच्या चळवळीतून आलेल्या वास्तववादी लेखकांनी अत्यंत वास्तववादी लिहिण्याच्या नादात छंदीफंदी मनोरुग्ण असा नायक उभा केला. मला वाटत नाही की असा नायक समाजापुढे दिपस्तंभ म्हणून उभा राहील. आपण मात्र या कादंबरीच्या माध्यमातून उभ्या केलेल्या केलेल्या प्रयत्नात मूल्य पूर्णपणे यशस्वीपणे उभे राहतात, असे मला वाटते.
              साहित्य व्यवहारातले अनेक बारकावे, तसेच साहित्य व्यवहारातलं अंतर्गत घुसमट, राजकारण ,कंपूशाही, मोठमोठ्या लेखकांना आलेलं एखाद्या मठाधिपतीचं स्वरूप याविषयी आपण येथे निर्देश केलेला आहे. आणि मी मी कोणत्याही गटात नाही याचं इंगित, जाहीर,  घोषितसुद्धा केलेले आहे. आपला नायक स्वायत्ततेचा मार्ग अत्यंत जाणीवपूर्वक कृतिशीलपणे आणि निश्चित भूमिका घेऊन स्वीकारतो, हे फार महत्त्वाचे मला वाटते.
                       खरं म्हणजे कुठलेही लेखन हे लेखकाचं स्वतःचं अनुभव संचित असतं.तो आपलं चरित्रच दरवेळी नव्याने लिहून काढत असतो, आपल्या जगण्याची तो चिकित्सा करत असतो. जे- जे लिहायचं, जगायचं राहून गेलं ते तो लिखाणाच्या समांतर विश्वात भरून काढत असतो. तसेआपल्या व्यक्तीगत, खाजगी जीवनाचे आणि जगण्याचे अनेक तपशील आम्हाला माहीत आहेत . ते या कादंबरीत  दिसतात देखील ,परंतु ते सारे तपशील अत्यंत कलात्मक गुंफनीचाद्वारे या कथात्म संहितेत मर्ज झालेले आहेत.
                     देव,धर्म, भय ,मैथुन, परंपरा, रिती यांच्यातला वांझपणा आणि माणूस म्हणून आपला त्यात गुंतलेला श्वास पकडण्याचं सूक्ष्म काम ही कादंबरी करते. आणि या साऱ्या तला फोलपणा देखील बारकाईने डते. खरं तर हे आपले आत्मचरित्रच असले पाहिजे असे मी म्हणेन .कारण आपल्या शब्दात सांगायचं तर येथे अनेक ' गाठी ' आणि 'सरगाठी ' बांधून आपल्याच वेदनेला कलात्मक केलेले आहे, असे असले तरी आपला तटस्थ असा दृष्टीकोन सारखा प्रतिबिंबित होत राहतो. गीते मधल्या 'साक्षीभाव ' आणि बौद्ध परंपरेतला 'स्वयंप्रज्ञता ' जागोजागी दिसून येते. आपलं परंपरेतून मिळालेलं सर्वकाही चांगलं असतं असं गृहीतक स्वीकारून लिहिणारा लेखक करमणूकप्रधान फारतर लिहू शकतो ,परंतु तो भान देत नाही. आपल्या परंपरेत अनेक गोष्टी चिकित्सा कराव्यात अशा आहेत हेच तर आपली ही कादंबरी सांगते .खरंतर त्या इतक्या वाईट आणि व्यामिश्र अशा स्वरूपाच्या चालीरिती आहेत की, त्यांच्या गोष्टी सांगून सांगून देखील पूर्ण होणार नाहीत, इतक्या त्या अथकपणे आपल्या आसपास घडत असतात, हेच तर ही कादंबरी सांगते.
                  अत्यंत नाट्यमय असे प्रसंग वाचताना डोळ्यापुढे उभे ठाकतात. मला तर ग्रीक आणि रोमन नाटकं मधला जो स्टेजवर नेपथ्याद्वारे उभा केलेल्या 'वन एक्ट प्ले' असतो तसं चित्र डोळ्यासमोर दिसत होतं.  हा निवेदक अनेक गोष्टींचा डायलॉग आणि मोनोलोग आपल्याशी करतो आहे. तो समकालाची भानगड सांगता सांगता भूतकाळात घेऊन जातो, तेथून तो अलगदपणे बाहेर काढून, आपल्याला आजच्या आर्थिक कोंडीची,सामाजिक विषमतेची आणि राजकीय अपरिहार्यतेची गंमत(गोची ) सहज सहज सांगत राहतो. आणि आपण किती असहायपणे या साऱ्या गोष्टींकडे पाहतो याचं भान देखील तो देत राहतो.
              कादंबरीचे अभ्यासक असं म्हणतात की, 'संस्कृतिक मॅच फिक्सिंग करण्याची वर्चस्ववादी दीर्घ परंपरा मराठीमध्ये असल्याने वांग्मयीन बाह्य राजकारणाला साहित्यकृतीने बहुजनांच्या अडाणीपणाचा फायदा घेत सवत ठेवले आहे '. या म्हणण्याला आपली कादंबरी अपवाद आहे अशी माझी स्पष्ट धारणा आहे. दुसरी बाब म्हणजे मराठीत असंही म्हटलं जातं की, 'साहित्य म्हणजेच आकांक्षा व सत्तेच्या स्पर्धेच्या राजकारणाचा खेळ असतो. '  परंतु आपण या कादंबरीतद्वारे आपल्या रोजच्या जगण्यातले साधे साधे प्रसंग अगदी -अगदी आसपास वावरणारे घराशेजारचे माजलेले  डुकरं ह्या प्रतिमांतून सुप्तपणे स्पर्धेच्या राजकारणाकडे इंगित केलेआहे.
              प्रत्येक ग्रंथ हे वाल्मिकी -व्यास- होमर- मिल्टन आणि कुंटे यांची सांस्कृतिक समरभूमी असते असं मर्ढेकरी आलोकिक सौंदर्यशास्त्र म्हणायचे .खरं म्हणजे या सगळ्या पारंपारिक अशा निकषांनी साहित्याला मोजण्याचे दिवस आता संपले आहेत. याचा सुतोवाच करणारी आपली कादंबरी आहे. पुढे  आत्मचरित्राच्या बाबतीतही लोक असे म्हणतात कि, 'कुशलतेने खोटे पटवून देण्याची उत्तम कला म्हणजे आत्मचरित्र होय '. आपली कादंबरी वाचताना एकाच वेळेस ती कादंबरी म्हणून डिस्क्रिप्टिव्ह लिबर्टी घेताना दिसली त्याच वेळेस ती आत्मचरित्राचा बाज घेत परंतु प्रखर असं सत्य प्रतिपादनाची अत्यंत धाडशी भूमिका घेताना दिसते. एडवर्ड सईद याने 'कल्चर अंड इम्पेरियलिस्म ' या ग्रंथात कादंबरी हीचे मूळ युरोपीय संस्कृती व साम्राज्यवादाची आधुनिक निर्मिती आहे,असे प्रतिपादन केले.परंतु हेही आता मागे पडले आहे. डेमोक्रसी इम्पेरीलिझम आणि या दोहोंच्या कचाट्यात सामान्य माणसाचे सापडलेले सांस्कृतिक जीवन अशी गोची आपल्या जगण्यात आलेली आहे. हे पटवताना आपली कादंबरी खात्रीशीरपणे उभी राहते.
        'कोसला ' सारखे सांस्कृतिक पिसे व राजकीय काड्या ती करत नाही किंवा 'पानिपत ' मधील या देशातील गद्दारांच्या प्रतिमा उजळ करण्याचे पातक ती करत नाही. हे न करणे म्हणजे लोकप्रीय प्रघाताला नकार होय, हे मोठेच काम म्हटले पाहिजे. शिवाजी सावंतांच्या 'मृत्युंजय 'सारखे अंधश्रद्धेचे झुले पांघरण्यापेक्षा आपल्या रोजचे ताणेबाणे आणि मामुली प्रश्न यातून ती उभे ठाकलेले अंतर्यामी प्रश्नांचा शोध घेते. 'मृत्युंजय', ' स्वामी 'किंवा 'ययाती ' या कादंबऱ्यांनी मराठी लेखकांना ट्यूसर पॅराडाईम( ग्रीक प्रमाणक ) स्वीकारण्याची सक्तीच अनेक वर्ष चालत आलेली आहे. त्यांच्या या सांस्कृतिक दुराग्रहला छेद देण्याचे काम दलित साहित्याने प्रथम केले आणि प्रभाव मुक्त लेखन काय असू शकते हे दाखवून दिले. आपल्या कादंबरीवर कोणाच्याही प्रभावाची टा दिसत नाही, प्रभाव मुक्त कादंबरी असच मी या कादंबरीला म्हणे.
              आपल्या भाषेचा पोत आणि सौष्ठव हा स्वतंत्र विषय आहे, तो पुणेरी किंवा प्रभावातून आलेला सदाशिवपेठी नाही ही जमेची बाजू होय.  आपला पोत अस्सल अहिराणी आणि कान्हेरी नदीच्या मंथनने संतृप्त आहे असे मला वाटते. कादंबरीचे अभ्यासक आणि समीक्षक जी. के .ऐनापुरे असं एकेठिकाणी म्हणतात  की , 'ब्राह्मणीसाहित्य आणि त्यातून निर्माण झालेले सांस्कृतिक वर्चस्व रोखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना अस्तित्वात आणली ' .खरं म्हणजे बहुजन वर्गातून आलेल्या किती लिहित्या लेखकांना ह्या नॅरेशनचं सांस्कृतिक भान आहे? हा खरा कळीचा मुद्दा आहे .परंतु आपण एका वाक्यात आपली भूमिका मांडली, 'ते म्हणजे देवाची गाणी सिनेमाच्या चालीवर म्हणावी लागतात यातच देवांचा पराभव आहे ' यातून आपण एका व्यवस्थेला नकार देत दुसरी स्वीकारली आहे.आपल्या या कादंबरीत संशोधनं येतात, वन्यजीव येतात अशा अनेक भौतिक, लौकिक आणि पारलौकिक माणसांना स्पर्श  ती करते.  येथे कादंबरीत मांजराला आडवी जाणारी माणसं सापडतात, तशीच ओठांच्या पुरस्कारांची रस्सीखेच करणारी माणसेही दिसतात, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या आक्रस्ताळा प्रपोगंडा  बळी पडलेली माणसे ही दिसतात .सेलफोनच्या धुंदीत हरवलेलं आजचं तारुण्य दिसते, तसेच 'महामुषकांची निर्मिती ' असे वक्र शब्दयोजना करून त्यामागे आपल्या व्यवस्थेची खिल्ली उडवत, निषेध मांडणारी शैली या कादंबरीत अधोरेखित होत जाते.
             सुधर्म देव किरण याचं भटकणं, आजच्या व्यापक जगण्याचा एक भाग आहे. तसेच त्याचे भरकटणे हेदेखील आजच्याच जगण्याची निकड आहे. व्यक्तिगतते कडून त्याचं समष्टीकडे होणारे संक्रमण मूल्ययुक्त आणि 'स्व' आयुष्याचे विविध अँगलमधून एक्स-रे काढणारे आहे. तुमचा जो तुमच्या पुरता  आशय होता  तो समष्टीसमग्र होतो. कोणता आशय? हाच की, खरोखर माणसाचं जगणं हे गोष्टीत मावणारे नसतं !
राकेश वानखेडे ( 94 23 54O 366)

******
        
        

समतेचे प्रवर्तक- महात्मा बसवेश्वर : विश्वास सुतार








                                         समतेचे प्रवर्तक- महात्मा बसवेश्वर

आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने  सारे जग आपल्या हाताशीच नव्हे तर अगदी जणू मुठीतच आले आहे. प्रांत आणि देशांच्या सीमा धूसर होत आहेत. जागतिकीकरणाने जग एक खेडेच होत आहे. दळणवळण आणि संपर्क माध्यमांच्यामुळे अनेक गोष्टी सहज सुलभ होत आहेत. ज्ञान आणि उद्योग- व्यवसायाच्या संधी विविध पर्यायांनी आज आपल्यासमोर उपलब्ध आहेत. गुगल गुरूच्या मदतीने एका क्लिकवर ज्ञानाचा खजिनाच आपल्या डोळ्यांसमोर येतो आहे.  भौतिक गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आमची अव्याहत धडपड सुरू आहे. यापलीकडेही स्वतःसाठी आणि इतरांसाठी म्हणून काही जगणं असतं, हेही सांप्रतकाळी समजून घेणे आवश्यक ठरणारे आहे.
     एकविसाव्या शतकाबद्दलचे हे सांगणे याकरिता आहे की, आपण काळाच्या या तुलनेत आठ- नऊशे वर्षे मागे गेलो तर आपणास काय दिसेल ? अगदी पन्नास- शंभर वर्षांपूर्वी आपल्या भोवतीची सामाजिक, धार्मिक, आर्थिक परिस्थिती काय होती ? आपण ठामपणे सांगू शकतो, ती माणसाला 'माणूसपण' देण्यात हतबल ठरत होती. काही राजकीय आणि समाज क्रांतिकारकांनी आपल्या पूर्वसुरींच्या पावलावर पाऊल ठेवून माणसाला माणूसपण देता यावे म्हणून समतेच्या प्रस्थापनेसाठी अविरत कष्ट घेतले आहेत,आपले अवघे आयुष्य वेचले आहे. असे समाजधुरीण मात्र नेहमी अल्पमतात ठरले आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध यांना सतत लढा द्यावा लागला आहे. अनेकांचे प्राण धोक्यात आले, तर अनेकांना आपला देह गमवावा लागला. सॉक्रेटीस- तुकाराम - गांधी -दाभोळकर -पानसरे -कलबुर्गी ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. महात्मा फुले, वि.रा.शिंदे, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हमीद दलवाई अशा लोकांना टोकाचा संघर्ष करावा लागला आहे.
       सन ११६७ (१९६७ नव्हे) म्हणजे नऊशे वर्षापूर्वीचा बाराव्या शतकातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग आपण इथे पाहू या.   
       अनुभव मंटपाच्या सभागृहात सर्व सदस्य मुक्तपणे चर्चेत सहभागी झाले आहेत. सर्व जाती-वर्णाचे लोक एकत्र आले आहेत. भिन्नभिन्न जातीच्या लोकांनी इष्टलिंग दीक्षा घेतली आहे. सगळेच आता लिंगायत झाले आहेत.वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या सर्वांसाठी एकत्र भोजन होत आहे. या समुहात एक आहे हरळय्या. जो जातीने चर्मकार अर्थात चांभार आहे. दुसरा आहे मधुवरस, जो ब्राह्मण आहे. दोघे लिंगायत होऊन अनुभव मंटपात नित्य सहभागी होत आहेत. हरळय्यासोबत त्याची पत्नी कल्याणी आणि मुलगा शीलवंत हेही नित्यनेमाने अनुभव मंटपात येताहेत. तसेच मधुवरसाचे कुटुंबही त्याच्यासोबत येत आहे. मधुवरसाची मुलगी कलावती हीसुद्धा अनुभव मंटपात नित्य येत आहे. एकदा हरळय्या आणि मधुवरस अनुभव मंटपात जवळजवळ बसलेले पाहून कुणीतरी सहजपणे म्हणून गेले, "मधुवय्या आणि हरळय्या,तुम्ही दोघे आता सोयरे व्हायला हरकत नाही. शीलवंत आणि कलावती यांचे लग्न झाले की पुरे." खरंतर सहज म्हणून, बोलले गेलेले हे शब्द मधुवरसाने मनावर घेतले. त्याचा चेहरा खुलला. मन उल्हसीत झाले. त्याने हरळय्याकडे पाहिले. हरळय्या म्हणाला, "मधुवय्या, तुमची मुलगी सून म्हणून माझ्या चांभाराच्या घरी आल्यास ब्राह्मणजन काय करतील, तुम्हाला ठाऊक आहे का ? नको हा विचार."  अनुभव मंटपाच्या सहवासाने बदललेला मधुवरस म्हणाला, "हरळय्या, अरे, मी पुर्वीचा मधुवरस राहिलो नाही. माणसातली माणुसकी जाणणे मी शिकलो आहे. मी आता पूर्वीसारखा सनातनी आणि कर्मठ ब्राह्मण नाही. मी आता लिंगधारी लिंगायत आहे. तू तुझ्या कुटुंबाला विचारून घे. मी माझ्या मुलीला आणि पत्नीला विचारून घेतो. सर्वांची तयारी असेल तर मी या लग्नास तयार आहे."  दोन्ही कुटुंबांनी आपापल्या कुटुंबात चर्चा केली. सर्वांच्या सहमतीने विवाह निश्चित झाला. अनुभव मंटपात सर्वांच्या साक्षीने हा विवाह पार पडला. राजा बिज्जळाच्या कल्याण राजधानीत ब्राह्मण आणि चांभार या दोन जातीतील वधू-वरांचा विवाह झाला. खरंतर वधू आणि वर दोघेही आता ब्राह्मण वा चांभार नव्हतेच. तर ते लिंगायत झाले होते. त्यामुळे हा आंतरजातीय विवाह नव्हता. तरीही या धर्मविरोधी घटनेमुळे राजांने हरळय्या आणि मधुवरस यांचे डोळे काढण्याचा अघोरी हुकुम दिला. तसेच दोघांनाही हत्तीच्या पायी बांधून मृत्यू येईपर्यंत फरफटत ओढत नेण्याची शिक्षा जाहीर केली आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणलीही !
     हा प्रसंग बाराव्या शतकातील आहे, हे लक्षात घ्या. जातिव्यवस्था मोडून काढण्यासाठी या दोन बापांनी ठामपणे केलेले आत्मबलिदान महत्त्वाचे आहे. या दोघांनी ज्या प्रभावी विचाराखाली हा निर्णय घेतला, ते प्रभावी विचार महात्मा बसवेश्वर यांचे होते. एकूणच भारतवर्ष आणि अन्य देशांमध्ये प्रबोधनाचे पर्व सुरू होण्याआधीच असे क्रांतिकारी आणि विद्रोही विचार भारताच्या मंगळवेढा, कल्याण (कर्नाटक) या दक्षिण भागात रुजवले जात होते आणि ते प्रत्यक्षात आचरणातही आणले जात होते. ज्यांनी आपल्या अनुभव मंटपाच्या वचन सिद्धांतातून सर्व जगताला समतेचा आणि जगण्याचा मार्ग दाखवला ते आद्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर होते. सर्वसामान्यांसाठी ते बसवण्णा होते.तीच त्यांची प्रभावी ओळख आहे. हीच ओळख सर्व समाजात ठळक होणे आवश्यक आहे. पुरोगामी चळवळींसाठी गेली आठ-नऊशे वर्षे मार्गदर्शक आणि पथदर्शी ठरणारे त्यांचे जीवन आणि कार्य समजून घ्यायलाच हवे.

विश्वास सुतार,कोल्हापूर
शिक्षण विस्तार अधिकारी,पं.स.करवीर
९४२०३५३४५२
परिचय : 👉समाजभान उपक्रम संकल्पक
👉 आकाशवाणी मान्यताप्राप्त गायक
👉 संवादी विचार, खलिलवाणी या व्हीडीओ मालिकेद्वारी प्रेरणादायी विचार
👉 समतेचा विचार पेरणाऱ्या पुस्तकांचे लेखक : "भारतीय संविधान आणि लोक" , "तुकाराम नावाचा संत माणूस "
👉 दै.लोकमतमध्ये 'खलिलवाणी' आणि दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये 'संवादी विचार' साप्ताहिक मालिकांचे लेखन
👉 'शिक्षण विस्तार अधिकारी' पदावर पं.स. करवीर येथे कार्यरत 👉शिक्षकांना प्रेरणा देणारा नवोपक्रमशील अधिकारी म्हणून ओळख

********













********

                                     महाराष्ट्र शासनाचा श्री.नां.पेंडसे पुरस्कार विजेती कादंबरी 

बुधवार, 29 अप्रैल 2020

मनोहर तल्हार यांची जुनी मुलाखत




( प्रमोद मुनघाटे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.)

लोक म्हणतात, ‘माणूस’ नंतर तल्हार संपले...
जुनी मुलाखत१९९५ 

□■
“लोक म्हणतात, ‘माणूस’ नंतर तल्हार संपले, पण लेखक कधीच संपत नसतो. पाच-दहा वर्षांनंतर तो ज्वालामुखीसारखा स्फोट घेत असतो. पण दरम्यान त्याची ज्वालामुखी निद्रिस्त असते एवढेच. आणि त्याला कारणेही असतात. तुम्ही विचारता की, जीवनात कोणती गोष्ट राहून गेल्याची रूखरूख आहे. मी माणूस कादंबरीत शंकराचे अपघातात दोन्ही पाय जातात असे लिहिले होते. माझ्या जीवनात पुढे घडणाऱ्या घटनेचे जणू मीच पूर्वसंकेत दिले होते, असे मला आज वाटते. मी खामगावला असताना माझे वडील डोक्यावर सामान वाहून आणित असताना रेल्वेचे इंजिन कोसळले व त्यात त्यांचे दोन्ही पाय कापल्या गेले. अत्यंत तडफत्या अवस्थेतही त्यांनी सोबत असलेल्या धाकट्या भावाला खिशातील तिकिटे काढून दिली व दहा मिनिटात त्यांनी प्राण सोडला. त्यांच्या मृत्यूला मीच जबाबदार आहे असे वाटते. मीच त्यांना माझे सामान त्या पद्धतीने आणायला सांगितले होते. जीवनातील ही घटना मी अद्यापी शब्दबद्ध करू शकलो नाही हीच माझी रूखरूख आहे. या घटनेचा माझ्या मनावर एवढा परिणाम झाला की मी पुढे आठ-दहा वर्षे काहीच लिहू शकलो नाही, भ्रमिष्टासारखा झालो आणि लोक म्हणायचे ‘माणूस’ नंतर तल्हार संपला की काय?”

“जीवनात आणखी काही राहून गेल्याची रूखरूख आहे काय?” या माझ्या प्रश्नाला मनोहर तल्हार यांनी वरील उत्तर दिले. कुणाही सहृदय वाचकाला हादरवून टाकणारे हे उत्तर होते.

मराठी साहित्यात अव्वल सोने ठरलेल्या ‘माणूस’ कादंबरीचे लेखक मनोहर तल्हार यांनी प्रत्यक्ष किती सोसले होते, ते मला त्यांच्या बोलण्यातून कळत होते. मुलाखतीचे निमित्त होते, नागपूर जिल्ह्यातील अंभोरा येथे १९९५ मध्ये झालेल्या सत्तेचाळीसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाचे त्यांनी स्वीकारलेले अध्यक्षपद.

 एकूण पाच कादंबऱ्या आणि पाच कथासंग्रह अशी निर्मिती नावाशी जमा असलेल्या तल्हारांची ‘माणूस’ नावाची कादंबरी प्रचंड गाजलेली. गेली कित्येक वर्षे सातत्याने लोकप्रिय ठरलेल्या या कादंबरीतील मनस्वी पात्राप्रमाणेच मनोहर तल्हार अतिशय भाऊक आणि मनस्वी व्यक्तिमत्त्वाचे आहेत. एखाद दुसरा अपवाद वगळता वाङ्मयातील जाणकारांनी आपल्या लेखनाची पुरेशी दखल घेतली नाही याची त्यांना खंत आहे, तर अतिसामान्य माणसातील माणूसपणाचा अत्यंत  साध्या-सरळ शैलीत शोध घेणाऱ्या या प्रतिभावंताला आपल्या प्रत्यक्ष जीवनातील अत्यंत दाहक अनुभव अद्यापिही आपण शब्दबद्ध करू शकलो नाही याची रूखरूख आहे. वाङ्मयीन क्षेत्रातील कोणत्याही वाद-प्रवाहाशी संबंध नसल्याचे सांगणारे मनोहर तल्हार अंभोऱ्याच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदानिमित्त कोणताही नवा ‘विचार’ आपल्याला मांडायचा नाही असे प्रामाणिकपणे सांगतात.

□आपल्या लेखनाला सुरूवात केव्हा व कशी झाली?
■ मी वयाच्या दहाव्या वर्षी व्ही. शांताराम यांचा ‘कुंकू’ चित्रपट पाहिला. त्यानंतर ‘माणूस’ आणि ‘शेजारी’. या तीनही चित्रपटांनी मी बालवयात झपाटून गेलो होतो. तेव्हापासून सिनेमाचा मला नादच लागला. चित्रपटाच्या तांत्रिक व सौंदर्यात्मक बाजूंचा विचार करण्याची मला सवयच जडली. तेव्हाच्या ‘तारका’ साप्ताहिकात मी १९४९ पर्यंत चित्रपट समीक्षा लेखन केले. पुढे ते बंद पडले आणि माझी समीक्षाही बंद झाली. पण याच खिडकीतून मला माझ्यातील लेखक गवसला. मी कथा लिहायला लागलो. अर्थात प्रारंभीच्या माझ्या कथा अनुकरणशील होत्या. आता त्या फाडून टाकाव्याशा वाटतात. १९५५ मध्ये मी एकूण वीस कथा लिहिल्या, तेव्हापासून वर्षाकाठी आठ-दहा कथा मी लिहीत आहे. कथालेखनातून मी कादंबरीकडे वळलो. माझी पहिली कादंबरी ‘माणूस’ ही मी १९६१ मध्ये लिहीली.

□ तुमच्या कुटुंबात काही वाङ्मयीन वारसा होता का? सुरूवातीला तुमच्या कथा कादंबऱ्याना प्रतिसाद कसा मिळाला?
■  नाही, तसा कोणताही वारसा मला मिळालेला नव्हता. लौकिकदृष्ट्या अत्यंत सामान्य कुटुंबात व परिस्थितीत माझा जन्म झाला. पण सूक्ष्म निरीक्षण आणि माणसांच्या स्वभावाचा अभ्यास करण्याचा नाद यामुळे माझ्या सभोवतालच्या सामान्य माणसांनी मला कथा-कादंबऱ्यांचे विषय दिले. अतिशय बारकाईने चित्रपट बघण्यामुळे मला कथांची वर्णनशैली आपोआप अवगत झाली.
१९६० पर्यत पन्नास-साठ कथा लिहिल्या. पण जवळच्या मित्रांनी दाद देण्यापलीकडे, महाराष्ट्रातील कोणत्याही समीक्षकाने दखल घेतली नव्हती. अर्थातच मासिकांकडून ‘साभार’ कथा परत येण्याच्या काळात या गोष्टीचे सोयरसुतक मला नव्हते. ‘माणूस’ प्रकाशित झाल्यावर मात्र हे चित्र बदलले. परंतु ‘माणूस’ प्रसिद्ध झाल्यावरही ती चांगली आहे की सामान्य आहे याविषयी दहा-पंधरा वर्षे काहीही चर्चा झाली नाही. ती दुर्लक्षित राहिली. आणि एकाएकी १९७० नंतर मात्र रसिकांनी ‘माणूस’चे खरे स्वागत केले. मला आता त्याबाबत काही वाटत नाही. कारण जाणीवपूर्वक माझ्या कादंबरीवर कोणी लिहावे, चर्चा व्हावी म्हणून मी कधीच कोणत्या समीक्षकाजवळ गेलो नाही. कोणत्याही साहित्यिक कंपूमध्ये गेलो नाही.

□ पण ‘माणूस’ची पुढे एका वाङ्मयीन वादाच्या दृष्टीतून बरीच चर्चा झाली. एखाद्या वैचारिक प्रवाहाचा लेखक म्हणून आपणास लेबल मान्य आहे काय?
■  तुम्ही म्हणता तसे सामान्यातील सामान्य माणसाचा जीवनसंघर्ष मूल्यसंघर्ष वगैरे कोणतीही तात्त्विक किंवा वैचारिक भूमिका माझ्यापाशी कधी नव्हती, आताही नाही. मी मुळातच माणसांचा आतून-आतून शोध घेत असतो. माझ्या सहवासात आलेल्या व्यक्तींचे माझ्या मनावर कायम ठसे असतात. माझ्या लेखनात त्या व्यक्ती अपरिहार्यपणे येतात. माझी वर्णनशैली अतिशय वास्तवदर्शी आहे, असे मला वाटते. त्यामुळे सामान्यातील सामान्य माणूस माझ्या कथा-कादंबरीचा नायक होतो. यापेक्षा आणखी काही वेगळी माझी वैचारिक भूमिका नाही.

माझ्या मते कोणत्याही प्रतिभावंत लेखकाची पहिली कलाकृती ही त्याचे अप्रत्यक्ष आत्मचरित्रच असते. इतर कलाकृती या नुसत्या आवृत्त्या असतात. ‘माणूस’ नंतर माझ्या सर्व कादंबर्यांवर तसाच प्रभाव झाला असावा.
‘माणूस’ ही कादंबरी लिहिताना कादंबरीचा घट, तंत्र-मंत्र हे काहीच डोक्यात नव्हते. जशी कागदावर उतरत गेली तशी उतरली. त्यावेळी मी एका वेगळ्याच भावावस्थेत होतो. १९७० ते ८० या कालावधीत माणूस कादंबरीचे अनेकांनी वेगवेगळ्या दृष्टीतून मूल्यमापन केले. परंतु माझ्या कादंबरीची खरी समीक्षा जर कोणी केली असेल तर ती, डॉ. या. वा. वडस्कर यांनी. त्यांना माझ्या लेखनात कोणतीही वैचारिक भूमिका दिसत असो, त्यांनी अत्यंत समरसतेने माझ्या लेखनातील ताकद समाजासमोर प्रकट केली, याबद्दल माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे.

□ परंतु एकूणच मराठी समीक्षकांविषयी आपण समाधानी आहात का?
■  नाही. आपल्या वाङ्मयीन जाणकारांचा स्वभाव आहे किंवा नाही ते मला माहीत नाही. पण कोणीही मनापासून साहित्य आवडल्याची किंवा न आवडल्याची प्रतिक्रिया देत नाही. सर्व हातचे राखून बोलतात किंवा लिहितात. आजवरच्या चाळीस वर्षाच्या माझ्या वाङ्मयीन जीवनात फक्त मनापासून दाद देणाऱ्या एकाच माणसाचे नाव मी सांगतो, ते म्हणजे पु. ल. देशपांडे. खरोखरच मोठ्या मनाचा माणूस. अमरावतीत विदर्भ महाविद्यालयात व्याख्यानाला आले असता प्राचार्य डॉ. वि. भि. कोलते यांचे हस्ते निरोप पाठवून पु. लं. नी मला बोलावून घेतले. मी फारच भारावून गेलो. तसाच दुसरा प्रसंग व्ही. शांताराम यांच्या भेटीचा. त्यांच्या अनेक चित्रपटांवर मी लिहिले होते. मी लहानपणापासून त्यांचा फॅन होतो. ते आमचे हिरोच होते. नागपुरात एकदा मुक्कामाने आले असता, त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली, अत्यंत प्रेमाने जवळ घेतले, हे काही प्रसंग मी विसरू शकत नाही.

□ आपल्या लेखनामागे काही प्रेरणा आहेत काय?
■ माझी आई आणि माझे वडील यांचे संस्कार हीच माझी प्रेरणा आहे. त्यातूनच मी लिहीत गेलो. मला कोणीही गुरू नव्हता. गुरू करण्याची इच्छाही नव्हती. कोणते आदर्शही नाहीत. चित्रपट बघण्याचा नाद व प्रत्येक घटना बारकाईने, तपशीलवार टिपण्याचा छंद यातूनच सभोवतालच्या व्यक्तींना शब्दबद्ध करण्याची कृती माझ्या हातून होते.

□ अंभोरा येथील सत्तेचाळीसाव्या विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकरिता निवड झाल्याबद्दल आपले अभिनंदन! अध्यक्षपद मिळाल्याबद्दलची आपली प्रतिक्रिया सांगू शकाल?
■ अध्यक्षपद मिळाल्याचा अर्थातच आनंद आहे. परंतु मी लेखक असलो तरी कोणी मोठा विचारवंत किंवा फर्डा वक्ता नसल्याने अशा संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ गळîात पडावी असे मला कधी वाटले नव्हतेच. मला रक्तदाबाचा विकार आहे. चार-सहा मित्रात तावातावाने बोलण्याची मला सवय असली तरी ‘श्रोत्यां’च्या पुढे उभे राहिले की माझ्या हाता-पायांना कंप फुटतो. कधी कधी तर माझ्या तोंडून शब्दच बाहेर पडत नाही. अशा माझ्या मानसिक व शारीरिक अवस्थेत संमेलनाच्या अध्यक्षपदावरून तासभर बोलणे म्हणजे डोक्यावर पहाड घेऊन तीन-चार मैल फिरण्याइतके कठीण होते, असो. साहित्य संघाच्या   पदाधिकार्यांना नकार देणे मला जमले नाही. पण अध्यक्षपदाबाबत मी अत्यंत आनंदी आहे.

□ तुम्हाला तुमचे आवडलेले पुस्तक कोणते?
■  ‘माणूस’

□आवडणारे लेखक कोण?
■ चेकाव्ह, टालस्टाय, दास्तो व्हॅस्की, रवींद्रनाथ, शरदचंद्र, प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणू आणि मराठीत श्री. ना. पेंडसे, जी. ए. कुळकर्णी, जयवंत दळवी, गाडगीळ-गोखले, भालचंद्र नेमाडे आणि नागनाथ कोतापल्ले.

□आवडते नट?
■ चार्ली चॅप्लीन, लार्ड गेबल, इन्ग्रिड बर्गमन, नार्मा सिएटर, ग्रेटा गार्बो, दिग्दर्शकांपैकी सत्यजित रे, व्ही. शांताराम, गुरूदत्त, राजकपूर, देवकी बोस, मेहबूब खान, राजा परांजपे आणि राजदत्त.

□आता शेवटचा प्रश्न: अंभोऱ्याच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आपण काही नवा विचार मांडणार आहात काय?
■ काहीही नाही! जे बोलावेसे वाटले ते लिहून काढले. कोणाला मार्गदर्शन करावयाचे नाही. कोणाविषयी आकस नाही, कोणत्या गटाविषयी प्रेम नाही. वाङ्मयातील सृजनशीलता प्रामाणिक असावी एवढा एकच ध्यास आहे.

(मुलाखतीचे श्रेय : Praveen Bardapurkar )

□■
-प्रमोद मुनघाटे
( पूर्वप्रसिद्धी : लोकसत्ता, नागपूर दि. ६ जानेवारी १९९५ )

सृजन संवाद : प्रमोद मुनघाटे
तनुजा प्रकाशन, नागपूर, २००६

मंगलवार, 28 अप्रैल 2020

पंढरी :खानोलकरी प्रतिभेचा अंगावर येणारा अनुभव




चिं. त्र्यं.खानोलकर 

                               
    पंढरी :खानोलकरी प्रतिभेचा अंगावर येणारा अनुभव 

 इसवी सन १९६० नंतर कथाकार म्हणून उदयास आलेल्या आरती प्रभू उर्फ चिं .त्र्यं .खानोलकर यांचे सनई (१९६४ ),राखी पाखरू(१९७१) आणि  बाप (१९७८)  हे तीन कथासंग्रह आणि गणूराया चानी आणि चाफा व  देवाची आई इत्यादी दीर्घकथांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत .
      १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या' राखी पाखरू' या कथासंग्रहातील 'पंढरी' ही कथा वाचकांच्या मनाला स्पर्शून वाचकांच्या मनात पक्के घर करून राहते . आईविना पोराची होणारी फरफट वाचताना आजही मन हेलावून जाते .खरंतर खानोलकर यांची ही कथा म्हणजे 'माणसाचा स्वभाव शरीराबाहेर येणाऱ्या वासना आणि विकार यांच्या ताणातून  नातं निर्माण झालेली शोकात्मिकाच  होय .
       पंढरी अगदी दोन तीन महिन्याचा असतानाच त्याच्या आईचा मृत्यू होतो . त्यामुळे त्याच्या आयुष्याची फरफटीत त्याला त्याच्या आईची आठवण येत नाही . येणार तरी कशी ? त्याने त्याच्या आईचा चेहरा पाहिलेला नसतो . आईनंतर पालन पोषण करणारी आजी त्याला दुःखाच्या प्रसंगी आठवत राहते .
       जन्मकुंडली सारख्या भंपक बाबीवर विश्वास ठेवणारा ,दिवसभर पंचांग पुढ्यात घेऊन बसणारा ,अगदीच अल्प आर्थिक प्राप्ती असणारा पंढरीचा बाप म्हणजे जणू माणूस आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती ,त्याचे दारिद्र्य ,त्याची मध्यमवर्गीय स्थिती आणि त्यातून निर्माण झालेली नकारात्मक मनोवृत्ती होय.
     पंढरीच्या जन्मदात्या पित्याला या गोष्टीचेही भान नाही की पत्नी नंतर अतिशय सुंदर असणाऱ्या एकुलत्या  एक मुलाची पालन पोषणाची जबाबदारी ही आपलीच आहे .याउलट मुलाच्या पत्रिकेत सुख कमी आहे व आपल्या पत्रिकेत आपण स्वतःच्या पोटात लागेल इतपतच मिळवत असल्याचे व 'ब्रह्मदेवाच्या भविष्यात आपण बदल करणारे कोण असा विचार करून आईविना पोरास आजी नंतर कुंडली पाहून एका शुभमुहूर्तावर घराबाहेर काढतो .याप्रसंगी खानोलकर कल्पनारम्य भावविश्वाचा चित्रणाऐवजी मानवी मनात चालणाऱ्या भावनाच्या आंदोलनाचे वास्तव पंढरीच्या रूपाने चित्रण करतात . आई व आजीच्या मृत्यूनंतर पारखा झालेल्या पंढरीला त्याच्या बापाचे हे क्रूर व माणुसकीशून्य रूप पाहून आजीची खुप आठवण येते . तो आजीच्या वळकटीजवळ जातो आणि त्यातही आजीचे प्रेम शोधण्याचा प्रयत्न करतो . शिरावर बाप असताना स्वतःच्या पोराला निराधार बनवणाऱ्या बापाच्या क्रौर्याची सीमा आणि व्यवहारी जगाचा अनुभव नसलेल्या पौंगडावस्थेत असलेल्या, स्वतःच्या निष्पाप मनाचा हातबलपणा पंढरीला काही केल्या ठरवता येत नाही . झोपेत सुद्धा पंढरी तळमळत राहतो .
       खानोलकरांनी पंढरीच्या देखणेपणाचे वर्णन काही वेगळ्या शब्दात केले आहे. ते म्हणतात 'आभाळी मंद डोळ्यांचा ,पिंगट कुरळ्या केसांचा, लालसर गालांचा आणि सरळ नाकाचा , उभट चेहऱ्याचा पंढरी अतिशय सुंदर दिसत असे . दाहीदिशा मुक्त असणारा पंढरी एका विठोबाच्या मंदिरात आश्रयाला जातो . पित्याचे छत्र कायम असतानाही बेवारशी अवस्थेत  झोपलेल्या पंढरीला उठवत पुजारी त्याची ओळख करून घेतो .
      कथेचे निवेदन येथे अतिवास्तव पातळीवर येते . पुजारी काका बाक्रे त्याला शेंगदाणे भाजून विकावयासाठी द्यायला तयार होतात व एक वेळच्या जेवणाची सोय करतात .कसलाही कामाचा अनुभव नसताना केवळ एक वेळच्या जेवणासाठी व्यवहाराचा विचार न करता पंढरी तयार होतो .कारण दोन वेळच्या जेवणाची व डोक्यावर गरज भासणा-या निवाऱ्याची त्याला भ्रांत असते . या कथेतील काका बाक्रे या पात्राची मनोवृत्ती अतिशय संकुचित दिसून येते . रोज दोन रुपये कमावून देणाऱ्या पंढरीने  एक दिवस कमी पैसे आणले म्हणून रागावणारे  , जेवण बंद करणारे अतिशय भेदरलेल्या, घाबरलेल्या पोरसवदा पंढरीला आपल्या खोलीत झोपू न देणे म्हणजे अति संकुचित मनोवृत्ती होय .
     शेंगदाणे विकावयास गेल्यानंतर 'ए पोऱ्या 'अशी हाक मारून लोक त्याचे शेंगदाणे विकत घेतात परंतु त्याच्या गालाचा चिमटा घेत . मानसशास्त्रीय दृष्ट्या विकासाच्या पौंगाडा वस्थेत असणाऱ्या पंढरीला नुकतीच  लैंगिकतेची   जाणीव होऊ लागलेली असते . गालाला घेतल्या जाणाऱ्या चिमट्याने तो पुरता बिथरून जातो . चक्क पोरींसारखा लाजतो  परंतु त्याला ते नकोसेही  वाटत असते . खानोलकर यांच्या कथेचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे पात्रांच्या मनातील भाव , विचार भोवतीच्या परिस्थिती, घटना यांचे चित्रण व प्रतिमायुक्त निवेदन शैली यावरून दिसून येते .
    एक दिवस तुळसकरची नजर पंढरीवर पडते आणि त्याच्या मनातील वासना जागृत होते . तो पंढरीला शेंगदाणे विकत घेण्याच्या बहाण्याने जवळ बोलावून त्याच्या आईची चौकशी करु लागतो . त्याच्या गालाचा चिमटा घेऊन लगट करण्याचा प्रयत्न करतो . पंढरीला या सर्वांची कळस येते . आपल्या मेलेल्या आई विषयी  याचा काहीतरी वाईट हेतू आहे ,हे त्याच्या लक्षात येते .आई विषयी कधीही, कसलाही मनात विचार न आलेला पंढरी 'आपले आई कशी  असेल ? 'यावर विचार करू लागतो पण त्याच्या मनात विषयी प्रेम निर्माण न होता आपली आई सुंदर होती ,याचा त्याला तिटकारा येतो . जेव्हा वास्तविकता समजू शकत नाही तेव्हा चांगल्या बाबीही वाईट भासतात . या मानवी स्वभावाची जाणीव खानोलकर  या पात्रांच्या  यानिमित्ताने करून देतात .
       जशी रात्र होऊ लागते तशी पंढरीला आईविषयी नवी जाणीव होऊ लागते . 'आपल्या आईच्या सौंदर्यावर सारे जग उठले आहे , अन आपल्यावर तिच्या संरक्षणाची जबाबदारी आहे . 'या जाणिवेने त्याला झोपच येत नाही . त्या रात्री वासनांध मानवी मनाच्या पाशवी अत्याचाराचा  त्याला  अनुभव येतो . माणसाच्या विकारी मनाचे  क्रौर्य खानोलकरांनी अतिशय प्रभावीपणे रेखाटले आहे .
        या अनुभवानंतर मात्र पौंगडावस्थेतील  पंढरीच्या मनावर खोल परिणाम होतात . मूर्तीतील देवपण , ब्राम्हणांचे संस्कार त्यांच्या दृष्टीने कुचकामी ठरतात . ब्राम्हण असूनही ब्राम्हण असणाऱ्या पंढरीला खोलीत झोपू न देणाऱ्या बाक्रेकाकांची जागा आता तिरस्काराने घेतली जाते .तर दुसरीकडे चांभार असूनही पंढरीच संरक्षण करू इच्छिणाऱ्या अंतुनानाबद्दल विश्वास निर्माण होतो . त्यामुळे विठूरायाला नमस्कारही न करता पंढरी अंतुनानाकडे रहायला जातो .शेवटी माणूस गरजांशी निगडित जीवन जगतो व माणूस नियतीच्या हातचे बाहुले आहे . हे ही सत्य खानोलकर येथे अधोरेखित करतात .
         खानोलकर यांच्या या कथेतील पंढरी म्हणजे निष्पाप मनाची कोरी पाटी . ज्यावर  कोवळ्या वयातच भयंकर अनुभव कोरले जातात . आरावकर शास्त्री पंढरीचे वडील भारतीय समाजातील जबाबदाऱ्या टाळणाऱ्या पालकांचे प्रतिक ज्यांना परिणामाची जराही खंत नसते .  बाक्रेकाका म्हणजे बहुतांशी समाजात दिसून येणारी दुसऱ्याच्या परिस्थितीचा फायदा घेत आपल्या नफ्याचा विचार करणाऱ्या मध्यमवर्गीय संकुचित मनोवृत्ती तर तुळसकर म्हणजे समाजातील पाशवी विषयासक्त मानवी मनाचे प्रतिक होय .
         अशा तऱ्हेने समाजातील सर्व तऱ्हेच्या लोकांच्या वर्तनामुळे, स्वभावामुळे ,विचारांमुळे निष्पाप असणाऱ्या घटकाला मरणयातना भोगाव्या लागतात. माणसा-माणसातले परस्परसंबंध माणूस आणि समाजाने उभ्या केलेल्या नियमनांचा व मूल्यांचा संघर्ष . माणसाला मुळापासून उखडून टाकायला निघालेली नियती . शारीरिक विकृती यांनी ग्रस्त असलेल्या माणूस दुसऱ्या व्यक्तीशी बांधला गेल्याने वाटयाला येणारे दुःखभोग सोसणारा माणूस अशा स्तरावरच्या शोकात्मिका या कथेतून जाणवतात .

-- रचना
पूर्वप्रसिद्धी : आरती मासिक,मार्च २०१२


रविवार, 26 अप्रैल 2020

अण्णाभाऊंची शाहीरी .. लोकगीतांचे नवे परिमाण- प्रभाकर साळेगावकर

।।अण्णाभाऊंची शाहीरी .. लोकगीतांचे नवे परिमाण।।


शाहिरी कवितेच्या अविष्काराची मुळं यादवकालाच्या पुर्वीपासुन राजस्थानातुन आलेल्या भाटगिरीत रूतलेली आहेत.पारंपारिक शाहिरी कवितेला ब-या पैकी राजाश्रय आणि लोकाश्रय ही मिळाला हे लक्षात येते.अगदीच थोडक्यात  सांगायचे मःहणजे१७ व्या शतकाच्या उतरार्धापासुन पारंपरिक वाडःमयाच्या निर्मितीची सुरूवात आहे.
यातील संत साहित्याने अध्यात्माचा विचार केला तथापि शाहिरांनी करमणूक विभाग संभाळताना पराक्रम ,प्रेम ,विरह याचे दर्जेदार कथनाची बाजु लावुन धरलेली होती ,म्हणुनच ती लोकाश्रीत अधिक राहिली.
लोकसमुहास शाहिरी अधिक जवळची होण्याचे दुसरे कारण म्हणजे लोकजीवनावर प्रकाश टाकतच अधात्म सहजतेने संभाळणे आणि प्रबोधन करणे याचा लयदार बाज या वाड्ःमय प्रकाराला आहे.
शाहीरीचे प्रकार पाहता ती किती विविधतेने नटलेली आहे लक्षात आल्या वाचुन राहत नाही.
गण ,गौळण ,लावणी ,पोवाडा ,भेदिक गाणे ,तमाशा ,भेदिक तमाशा ,अशा संवाद ,संगीत ,वेशभुषा या त्रिवेणी संगमावरची ढंगदार शाहिरी प्रत्येक कालखंडात स्वत।चा ठसा उमटवतच दिमाखात खुलत गेली आहे.
      आपण उपरोक्त वर्णंंन हे आण्णाभाऊ ची शाहिरी समजुन घेण्यासाठी त्यातील वेगळे पण अधोरेखित करण्यासाठी पुर्वपिठीका ,भूमिका म्हणुन लक्षात घेतले पाहीजे.
    विसाव्या शतकाच्या प्रारंभीच पारंपरिक शाहिरी कवितेला नव्या अविष्काराचे नवे धुमारे फुटूलागले.
अज्ञानी ,अडाणी ,निरक्षर समाजाला नवी दिशा प्रदान करण्यास तमाशाचे रूप पालटत जाउन कर्ते सुधारक मंडळी " लोकनाट्य" संज्ञा घेवुन समाज प्रबोधन करु लागली हे सर्व श्रुत आहे. या लोकनाट्यात अंर्तभूत असणारी सत्यशोधकी जलसे ,आंबेडकरी जलसे ,राष्ट्रसेवादलकलापथक ,लालबावटा कलापथक ही सारी रुपं शाहिरीचीच आहेत .
    समाजपरिवर्तनाचा विचार मांडत वास्तवाचे जिवंत दर्शन वाड्ःमयीन बंधमुक्त राहून ज्यांनी मांडले ते आहेत आ्णाभाउ साठे.
समकालाचे भान ठेवुन विषमता ,अन्याय यांच्या विरूद्ध बंड करून उठण्याची प्रेरणा आण्णाभाऊ यांच्या लेखनीत आहे म्हणुनच आण्णाभाउ यांच्या साहित्याचा माणुस हाच केंद्रबिंदू आहे.
साहित्यसम्राट  आण्णाभाउ असा जेव्हा आपण उल्लेख करतो तेव्हा  त्यांच्या लेखनाचा प्रवाहही काळजावर गोंदवणे महत्वाचे आहे.
प्रथम शाहिरी ,नंतर कथा ,आणि त्यानंतर कादंबरी असा आण्णाभाऊंचा लेखन प्रवास आणि प्रवाह आहे.या वरुन एक बाब पुन्हा गडद होते साहित्यिकाची पहिली निर्मिती ही त्याची चार दोन ओळी का  होईना पण कविताच असते.
सर्वसामान्यपणे आण्णाभाऊ साठे यांनी १९४२ पासुन आपल्या शाहीरी लेखनास सुरूवात केलेली आहे असे दिसुन येते.
शाहिर द.ना.गव्हाणकर ,शाहीर अमर शेख  मुंबईत आले आणि त्यांची आण्णाभाऊ यांच्याशी ओळख झाली .कम्युनिस्ट पार्टीला हे तीन रत्ने मिळाली.
लालबावटा कलापथक समाज प्रबोधनासाठी गतिमान झाले.
१९४२ते १९६९ या कालखंडात आण्णाभाऊ साठे यांचे झालेले शाहिरी लेखन अतिशय कसदार आणि बहुआयामी मानले जाते.
लोकनाट्याशिवाय ज्या पद्य रचना आहेत त्या मधील प्रबोधनाचा विचार पिळदार आहे.
अस्सल संयत विद्रोह आणि क्रांतिकारी विचार या सोबतच
सर्वसमावेशी समुहभावना जपण्याचे कसब या साहित्य रत्नाच्या लेखणीला अवगत झालेले होते म्हणुनच आण्णाभाऊ साठे यांची पद्द्य रचना कालातीत आहे.
आण्णाभाऊ साठे यांच्या सागररूपी शाहिरीचा माझ्या अल्पमतीने मोती टिपण्याचा केलेला प्रयास आपल्या पुढ्यात ठेवतो आहे.
*गण* ...
 " प्रथम मायभू च्या चरणा
छत्रपती शिवबाचरणा
स्मरोनी गातो कवना..।।ध्रु।।
क्रांतीकारी विरांना आणि
त्यागी भूषणा
पणा लावुनिया प्राणा
अर्पियले जीवना...।।१।।

...पारंपरिक तमाशा मध्ये वंदन , देवदेवताचे स्मरण करुन रसिक मायबापाना आशिर्वाद मागण्यासाठी गण या प्रकाराची निर्मिती आहे ,परंतु आण्णाभाऊ साठे यांनी गण या पद्य प्रकारा पासुनच वैचारिक ,काल सुसंगत अधिष्टान मांडणीला सुरूवात केली.
उपरोक्त उदाहरणात कर्ताकरवित्या कलात्मक इशासोबतच मातृभूमी , देशभक्त ,हुतात्मे ,राष्टरवीर यांनावंदन करून कालसुसंगत मांडणीचा गण ते सादर करत असायचे हे लक्षात येते.

*आण्णाभाऊंची म्हणणी*

   पारंपरिक तमाशा च्या स्वरुपात गण झाला की 'गौळण ' असते.
गौळणीला अध्यात्मिकता कमी आणि श्रंगार अधिक असतो
आण्णाभाऊ यांनी गौळण हा प्रकार वजा केला करून ,नाकारून " म्हणणी " हा प्रकार कथासुत्राचा काव्यमय परिचय करुन देण्यासाठी रूढ केला.
"खानदेशामधी गाव राजुरी खेडे एक लहान
त्या गावची गोष्ट सांगतो घ्यावी ऐकुन ..।।१ ।।
एक सावकार ,दुसरा गवळी असे दोघेजण
मित्र भावाचे नांदत होते आनंदात ।।२।।
करती काळा बाजार दोघांचै नफ्यावर ध्यान
स्वार्थासाठी शेतक-याची मुरगळती  मान ।।३।।

  वरील म्हणणी आहे " अकलेची गोष्ट " या लोकनाट्या मधील कथासुत्र मांडणीची ,जी प्रयोगपुर्वी सादर केली जात असे.
पोवाडा
पोवाडा हा शाहिरी प्रकार गद्य आणि पद्य रूप धारुन करुन प्रारंभी पासुनच नटलेला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीत दुस-या अध्यायात "पवाडा " हा शब्द आलेला आहे. स्तुती अथवा भांडण या अर्थाने हा शब्द निर्माण झालेला असला पाहिजे.
आण्णाभाऊ साठे यांनी त्या काळाशी एकरूप होवुन व्यक्तीपर आणि घटना वर्णनपर पोवाड्यांची निर्मिती केलेली आहे.
काळ्या बाजाराचा पोवाडा ,
बर्लिनचा पोवाडा
महाराष्ट्राची परंपरा
बंगाल ची हाक
अमळनेरचे अमर हुतात्मे
मुंबई चा कामगार

या सारखे त्यांचे गाजलेले पोवाडे आहेत.
कलात्मक दृष्टीने विचार करायचा झाल्यास सहा चौकी असा महाराष्ट्र् परंपरा हा पोवाडा आण्णाभाऊ ची या प्रकारातली सर्वोत्तम कलाकृती वाटते..

    " महाराष्ट्र मायभू आमुची मराठी भाविकांची
संतमहंताची ज्ञानवंताना जन्म देणारी  ।।
नवरत्नाची दिव्य भांडार
समरधिर घेती जिथे अवतार ...जी ..जी....

महाराष्ट्र भूमीचे भौगोलिक ,ऐतिहासिक ,भाषिक ,सांस्कृतिक दर्शन या पोवाड्यात उधृत केलेले आहे. प्राकृत भाषेतुन मायमराठीला प्रतिष्ठा मिळवुन देणारे
संत ज्ञानेश्वर , स्वराज संस्थापक छत्रपती  राजे शिवाजी महाराज , समाजक्रांती चे अग्रदूत म.ज्यो.फुले ,क्रांतिसिंह नानापाटील ,अच्युतराव पटवर्धन यांचेही वर्णन या पोवाड्यात येते.

*लावणी*
आण्णाभाऊ साठे यांनी मोजक्याच परंतु अजरामर लावण्या लिहील्या आहेत.
लावणीचा धाट जुना परंतु आशय आणि विचार नवा हे या लावण्यांचे खास वैशिष्ट्य आहे.म्हणुनच आण्णाभाऊ ची लावणी ही कुलीन ,संस्कारी ,प्रबोधनपर अशीच आहे.
 १.सुगी २.साता-याची त-हा ३.मुंबई ची लावणी ४.कथा मुंबई ची ५.माझी मैना गावावर राहीली.
कलात्मक गुंफणीचा या लावण्या उत्कट अविष्कार करतात.
मुंबई ही माणसाला भूरळ घालते.
त्या काळातही मुंबई चा सुक्ष्म अभ्यास आण्णाभाउनी केलेला आहे. श्रीमंती ,दारीद्र्य ,यातील विषमतेचे भिषण वास्तव टिपताना आण्णाभाऊ लिहीतात..
" फोरास रोड ,तीन बत्ती गोल पिठा , नाक्यावरती
शरीर विकुन किती पोट भरती ..।।

प्राचिन मराठी लावणीत असा श्रंगार मांडुन काळीज पिळवटुन टाकणारे आण्णाभाऊ या अर्थाने चिरंतन मुल्य संभाळतात असे म्हणावे लागेल.
आण्णाभाऊ ची माझी मैना गावाकड राहीली ही संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील समरगीताची भूमिका निघावते असे मला वाटते.
दोन विभागातील लावणी म्हणजे मुंबई चा कामगार आपल्या पत्नीला गावाकडं सोडुन इथं काम करतो आणि दुसरा विभाग बेळगाव ,कारवार ,गोवा येथील मराठी माणसाची मुंबई जणु मैनाच आहे.
आण्णाभाऊ साठेयांच्या प्रतिक ,प्रतिमांच्या ,शब्दकळेला आलेला बहर या लावणीत अधिक गडद पणे ठसा उमटवतो..हेच पहा..

" ओतिव बांधा ,रंग गव्हळा ,कोर चंद्राची ..
उदात्त गुणाची ,मोठ्या मनाची ,सिता ती माझी रामाची ...।

उपरोक्त ठळक शाहिरी प्रकारा शिवाय आण्णाभाऊ साठे यांनी लोकगितांच्या परंपरेला नवेपरिमाण देऊन काही रचना लिहुन लोकभावनेच्या काळजाला हात घातलेला आहे.
१. जग बदल घालुनी घाव
२.उठला मराठी देश
३. दुनियेची दौलत सारी.
४.भारताची पहिली दिपावली .
५. शिवारी चला..रे

या रचना लोकप्रिय आहेत.
गरीबा विषयीचा कणव , दया ,मानवतावादी दृष्टी , मराठी मातीची ओढ , समकालीन तत्वज्ञान शाहीरी तुन ,स्फुट गीतातुन  मांडणारे साहित्य सम्राट ,आण्णाभाऊ साठे हे मराठी लोकसाहित्य ला कालातीत असे नवे परिमाण देतात.  लोकशाहीर आण्णाभाउ साठे यांच्या
 या समृद्ध अशा  अफाट आणि अचाट अलौकिक ,वास्तव वादी ,प्रतिभेला त्या़च्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमीत्ताने अंतःकरण पुर्वक वंदन.
(संदर्भ....श्री दत्तात्रय पाटील यांचे
आण्णाभाऊ साठे आणि शाहिरी वाड्ःमय )
- प्रभाकर साळेगावकर
9422295304

हिंदू मुस्लिम यांच्या वेदनेचा प्रवास : इंधन


                                                       

       साधारणतः पन्नासच्या दशकात प्रकाशित झालेली हमीद दलवाई यांची 'इंधन' ही कादंबरी स्वातंत्र्यानंतरही जिवंत असलेल्या जातीयतेच्या म्हणजे हिंदू-मुस्लिम ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वेदना, येणारी अस्वस्थता आणि माणसा-माणसांचा तुटत जाणारा संबंध, निर्माण होणारी संशयीवृत्ती या सर्व गोष्टी परखडपणे मांडते.
        वर्षानुवर्षे चालत आलेल्या हिंदू-मुस्लिम लढ्यावर भाष्य करणारी मराठी साहित्यातील अत्यंत महत्त्वाची कादंबरी म्हणून 'इंधन'कडे पाहिले जाते.
       मुळातच नायक मुस्लिम घरातील उभा केल्यामुळे कादंबरी वाचत असताना अनेक अंगाने विविध बाजू आपल्या समोर उभा राहत असतात. मुंबईतून विश्रांती घेण्यासाठी पंधरा वर्षातून गावी आलेला नायक आणि त्याला आलेले अनुभव कादंबरीत मांडलेले आहेत. गावात आल्यावर त्याच्या भावाला मारायला आलेले लोक आणि त्यावर परत केस करून बदला घेतलेला त्याचा भाऊ आणि हे प्रकरण शांत मिटावे म्हणून धडपडणारा नायक असे हे कथानक. पण प्रत्यक्षात कोणीही त्याच ऐकायला तयार नाही,म्हणून अस्वस्थ झालेला नायक. मग अशातच लक्ष्मी नावाच्या बाईवरून झालेला हिंदू आणि मुसलमानातील वाद. यामुळे गावाला आलेला बकालपणा आणि गावकऱ्यांची होणारी घालमेल या सर्व गोष्टी कादंबरीत मांडल्या आहेत.    गावात काहीतरी तंटा झाला आणि शांतपणे ते सोडवायला गेलेला नायक आणि त्याच कोणीही न ऐकल्यामुळे आलेली अस्वस्थता कादंबरीत मांडलेली आहे.
        वाद वाढत चालला की हिंदूंच्या पालखीवर बहिष्कार टाकणे, त्यांच्या पालखीची ओटी न भरणे किंवा हिंदूंनी मस्जिदीसमोर मोठ्याने ढोल वाजवणे असले धंदे सुरू झाले. म्हणजे सामाजिक एकोपा विस्कळीत होऊ लागला. नंतर सर्व काही ठीक झाल्यावर, गाव सोडून जाणारे लोक आणि गावकऱ्यांच्या मनात बसलेली भीती असे एकूण चित्रण कादंबरीत उभे केले आहे.
        गावात आल्यावर नायकाला भेटणारे लोक आणि त्यांची गावाबद्दलची आपुलकी आणि प्रेम पाहून तो थक्क होतो. जस विनोबा भावे म्हणतात, "पुलामुळे शहरे आणि खेडी जोडली गेली. पण यामुळे खेडी भिकेला लागली आहेत. हे पुलंच तोडून टाकले पाहिजेत." अशी स्वछ आणि निर्मळ भावना असणारे लोक कसे एका छोट्या घटनेमुळे एकमेकांच्या जीवावर उठतात हे  या कादंबरीत दाखवलेलं आहे. मग हिंदू लोक मुस्लिम लोकांच्या दुकानला जात नसे व मुस्लिम हिंदूंच्या. ही एक पोकळी निर्माण होत चालली आहे. आणि ही पोकळी म्हणजे एकूणच आपल्या सामाजिक व्यवस्थेचा बकालपणा  आहे.
       म्हणजे कसं झालंय, आजच्या समाजव्यवस्थेत आपल्याकडून नकळत अनेक गोष्टी घडत जातात. माणसे जनरुढीप्रमाणे बहुधा वाईटच वागत असतात. अनेकदा आपणहून आणि कधी इच्छेविरुद्ध त्यात ओढली जातो. मग मी कशाला त्राग करायचा?आणि किती? मग अशा समाज व्यवस्थेत अनेक पोकळ्या निर्माण होतात. छोट्या-छोट्या गोष्टींचं रूपांतर वाद, दंगली मध्ये होतं. हिंदू-मुस्लिम असो किंवा अमेरिकेमधील काळा-गोरा वाद असो. मग ह्या व्यवस्थेत काय होत जाणूनबुजून आपण एका समाजाचे हाल करत असतो. त्यांना कामावरून काढून टाकणे, अनेक ठिकाणी मुद्दाम डिवचणे किंवा धार्मिक भावनांचा उद्धार करणे. अशा गोष्टी वाढत जातात. पण मुळात बघायला गेलं की, या गोष्टी करणारे लोक खूप कमी आहेत आणि त्याचा त्रास पूर्ण समाजाला भोगावा लागतो. चूक भलतंच कोणीतरी करत आणि दंगलीमध्ये स्त्री, मुलांचे, म्हाताऱ्यांचे हाल होतात. म्हणजे करावे कोणी, भरावे कोणी. अशा व्यवस्थेत सामान्य जनतेचे हाल होतात. घरकोंडीपणा वाढतो, ज्या गावात कधी घराचे दरवाजे बंद नसतात तिथे लोक दार बंद करून एकमेकांना बोलणे टाळतात.
        हिंदू-मुस्लिम ताणतणाव आपल्या देशात वर्षानुवर्षे अगदी परंपरेगत चालत आलेला आहे. प्रत्येक वादामध्ये पुरोगामी मुस्लिम विचारधारा हळूहळू नष्ट होत चालली. आपली हिंदुत्ववादी विचारधारणा पुढे येत राहिली. या वादामध्ये प्रत्येक वेळी नुकसान मुस्लिमांचेच झाले. त्यांना व त्यांच्या विचारांना समाजासमोर कधीच येऊन नाही दिले. त्यांचा समाज नेहमी दबावाखाली ठेवण्यात आला. ना त्यांना न्याय मिळाला ना त्यांना कधी संधी मिळाल्या. अगदी बोटावर मोजण्याइतकी लोक त्यांची वर आली. याचा अर्थ एकच झाला की त्यांचे विचार आपल्या समाजाला मान्य नाहीत आणि आपण कळत नकळतपणे त्यांना कधी वर येऊन दिले नाही. कळत असूनसुद्धा आपण त्या व्यवस्थेचे बळी होत गेलो. आपण आपल्याच माणसांचे विचार दाबण्यात अग्रेसर होत गेलो आणि इथेच आपण एकेक पाऊल अधोगतीकडे टाकत चाललो आहे.
            हे वास्तवदर्शी चित्र या कादंबरीने उभे केले. ते चित्र आजपण आहे तसेच आहे. उलट त्यात अजून वाढ झाली आहे, आक्रमकता वाढली आहे. वाद कमी होण्याच्याऐवजी  दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. 'इंधन'च्या रूपाने या वादावर प्रकाश टाकण्याचे काम हमीद दलवाई यांनी केले आहे.
        खरंतर ही कादंबरी वाचकाला जिंकते कुठे तर, कादंबरींच्या कथानकामध्ये गावात देवीची पालखी चालली असते. संपूर्ण गावातून तिची यात्रा संपन्न होत असते. अचानक कोणतरी लोक येतात आणि स्त्रियांची विटंबना करतात. हे कोणी केले काहीच कळत नाही. ना ते लोक कोणाला माहीत असतेत ना कोणी त्यांना बोलवलं ते. मग यावेळी एक मुस्लिम लेखक म्हणून ते एक विधान करतात, 'जेंव्हा पोलीस येऊन कारवाई करतील तेंव्हा साक्ष देताना लोक म्हणतील की मुसलमान लोकांनी हे घडवून आणले असणार.' म्हणजे एक मुस्लिम असून अस विधान करणे खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण काय करतो हीच विचारधारणा वर्षानुवर्षं दाबत आलेलो आहोत. म्हणून आपल्या गंजलेल्या या विचारला बदलण्यासाठी ही कादंबरी खूप महत्त्वाची भूमिका निभावते.
 - प्रतीक कदम
B.E.(Mach. Final year)
Savitribai Phule Pune University, Pune.


****
शासनाच्या ग्रंथ खरेदी यादीतील महत्त्वाचा ग्रंथ


शनिवार, 25 अप्रैल 2020

विषाणूपुढे हतबल मानवाला उमेद देणारी कविता : प्रा. जयसिंग गाडेकर

( परिचय : प्रा.सौ. मीनल सुरेश येवले,
एम. ए.मराठी,राज्यशास्र,समाजशास्त्र बी.एड.एम.फिल.
पद -  कनिष्ठ व्याख्याता ग्रामविकास कनिष्ठ महा.कुही 
           जि. नागपूर
*प्रकाशित पुस्तके*
* मोहोर    - कवितासंग्रह - 2007
* परिघ    - कवितासंग्रह - 2013
* आंदण   - ललितलेख संग्रह - 2017
* एकांताचे कंगोरे  - ललितलेख संग्रह - 2019
* मी मातीचे फुल - कविता संग्रह  - 2019
* वेदनेला फुटे पान्हा - कविता संग्रह - 2019 *कवितेच्या पाऊलवाटा - प्रकाशनाच्या वाटेवर

( लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहभागी असतीलच असे नाही - साहित्याक्षर )

आश्वस्त- विषाणूपुढे हतबल मानवाला उमेद देणारी कविता

नागपूरच्या कवयित्री  प्रा.मीनल येवले यांची 'आश्वस्त'ही कविता कोरोना च्या हल्ल्याने हाताश आणि भयभीत झालेल्या मानवजातीचे यथार्थ चित्रण करतेच पण या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील सांगते.
मागील दोन दशकापासून आपण जागतिकीकरण आणि उदारीकरण या दोन संकल्पनांचा अंगीकार केला आणि आपला देश देखील आपले भारतीयपण विसरून भौतिक साधनांच्या पाठीमागे धावणाऱ्या कधीही न संपणाऱ्या शर्यतीत सामील झाला. या स्पर्धेमधून मोठ्या प्रमाणावर लालसा वाढीला लागली साऱ्या जगावर आपला प्रभाव असावा अशा प्रकारचा अविचारी प्रभुत्व वाद काही राष्ट्रांनी जोपासायला सुरुवात केली यातून परस्परांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू झाले. जी राष्ट्र पूर्वी अण्वस्त्रांच्या माध्यमातून एकमेकांना धमकावत होती ती आता जैविक अस्त्रांच्या माध्यमातून प्रतिपक्षाला नेस्तनाबूत करण्याची संधी शोधू लागली. आजचा कोरोना नावाचा भस्मासुर या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे अपत्य आहे.. कोरोना हा डोळ्यांना दिसत नाही पण आभाळालाही देखील  व्यापून टाकेल अशा प्रकारची संहारक शक्ती असलेला विषाणू आहे आणि त्याने जगातील मानवजातीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अमेरिका, फ्रान्स इटली स्पेन जर्मनी अशी बलाढ्य राष्ट्रे देखील या कोणाशी सामना करण्यात सपशेल अपयशी ठरली आहेत आणि हताश होऊन मृत्यूचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.. या परिस्थितीवर भाष्य करताना कवयित्री लिहिते-
कुठे शोधायचे जगण्याचा दिलासा
देणारे संजीवन तत्व
कसे गवसायचे विनाशाला
थांबवण्याचे प्रत्ययकारी तंत्र
आता तर जीवनाच्या वाटाच अवगुंठित झालेल्या
किती हताशपणे बघतोय आपण
एकमेकांकडे ऐकतोय दूरवरून
अस्वस्थ करणारे भेसूर स्वर
या विषाणूने कोणालाही सोडलेले नाही. गरीब-श्रीमंत असा भेद ठेवला नाही की हिंदू मुस्लिम ख्रिश्चन अशा प्रकारच्या धर्मांच्या सीमा पाहिल्या नाहीत. सारेच त्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. त्यामुळे अवघे जगच भयभीत झालेली आहे. अगतिक,असहाय्य आणि वैफल्यग्रस्त देखील झाले आहे.
हा तो मी ते सर्वच अंतर्बाह्य
धास्तावलेले
दिवसांच्या भुमीत झाली वैफल्याची पेरणी
मनामनात उगवताहेत
भयाचे खुरटलेले , गर्भगळीत कोंब
मानवाच्या इतिहासामध्ये चढ-उतार हे सतत येत असतात. पृथ्वीवर जीवांचा जन्म होणे, त्याची प्रगती होणे आणि एक दिवस एखाद्या धूमकेतू सारख्या किंवा सुनामी सारख्या महा संकटात या जीवनाचा सर्वनाश होणे हे चक्र अव्याहतपणे चालूच आहे. आजही जणू मानवजात विनाशाकडे जाते आहे. स्वतःला प्रचंड सामर्थ्यवान समजणारा माणूस आज स्वतःला आत्मविश्वास पूर्णपणे गमावून बसला आहे असे दिसते. त्याच्या या मनोवस्थेचे वर्णन करताना कवयित्री लिहिते,-
युगायुगाच्या शापाने झालो आहोत
का आपण असे सत्वहीन
की , आपल्या आकाशाला हात
पुरणाऱ्या अहंकाराचा
फुटू बघतोय टंच भरलेला फुगा
या परिस्थितीत शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ आणि  तत्वज्ञ असे सारेच भांबावून गेले आहेत. अर्थात हे अक्राळविक्राळ प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला विज्ञान मदत करण्यासाठी आहेच. पण वैज्ञानिकांच्या मते या संकटावर मात करण्यासाठी किमान एक वर्ष लागेल.पण प्रश्न आजच्या या एकट्या कोरोना नावाच्या विषाणूचा नाहीच. प्रश्न आहे माणसाच्या मनाला जो स्वार्थ लोलूपतेचा विषाणू पोखरत आहे त्याच्यावर इलाज करायला हवा. अन्यथा ठराविक काळानंतर कोरोना सारखे भयंकर विषाणू या पृथ्वीवर येऊन मानव जातीचा संवर्ग करतच राहतील.. यासाठी गरज आहे माणसाने आपले माणूसपण टिकवण्याची.. हाच एकमेव आश्वस्त उपाय या संकटातून माणसाला वाचवू शकेल.. कवयित्री या ठिकाणी लिहिते -
प्रश्न आणि प्रश्नांचे आक्राळ विक्राळ
भोवरे देताहेत कोणत्या भयावह संकटाची सुचना ?
की , अजूनही जागे करताहेत
आपल्यातला माणूसपण टिकवण्याच्या चेतना
उमेदीला , सृजनाला , मानव्याला पोहोचू लागलीय झळ
म्हणजे भयंकर संकटातून माणसाला फक्त माणूसच वाचू शकतो आणि तेही आपले माणूस पण टिकवून. सुदैवाने आज जगातील कोट्यवधी ही निराधारांसाठी आधार देण्यासाठी लाखो हात पुढे आलेले आहेत आणि माणसाला जगवण्यासाठी निसर्ग नाहीतर माणसेच पुढे येऊ शकतात हे आपण स्वतः अनुभवतो आहोत. कवयित्री आपल्या कवितेचा शेवट करताना नेमके हेच सांगते आहे-
माणसाच्याच तर हातात आहे अजूनही हे संकट थांबविण्याची एक चिरंतन...आश्वस्त... कळ...
नागपूरच्या कवयित्री प्रा. मीनल येवले यांनी सध्याच्या महाभयंकर संकटाची उकल या कवितेतून अगदी नेमकेपणाने केली आहे आणि त्यावर निश्चित असा उपायही सुचवले आहे हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. साहित्य हे समाजाला दिशा देण्यासाठी असते ही बाब या कवितेने अगदी ठळकपणे अधोरेखित केली आहे. मीनलताई, या सुंदर कविते साठी आपल्याला हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि अगदी मनापासून अभिनंदन देखील...

- प्रा. जयसिंग गाडेकर
आळे, जुन्नर पुणे.
22 एप्रिल 20 20
*परिचय*
प्रा. जयसिंग गाडेकर*
+91 99703 41646
शिक्षण- M.Sc. (Organic Chemistry) B.Ed.SET.*
व्यवसाय- Head,*मा. बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे रसायनशास्त्र विभाग प्रमुख म्हणून गेली 25 वर्षे कार्यरत आहे.
गेली पंधरा वर्षे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा बहि:शाल शिक्षण मंडळ व्याख्याता म्हणून कार्यरत.*
सासवड, पिंपरी चिंचवड, डोंबिवली, बडोदे, यवतमाळ आणि उस्मानाबाद येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनात कवीकट्टा या काव्यमंचावर सलग सहा वर्षे कविता सादर केली आहे.*
 *तीन कविता संग्रहासाठी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे*
*'गझलची दुनिया' या व्याख्यानातून हिंदी मराठी आणि उर्दू गझल चे अंतरंग उलगडवून दाखवले आहेत. आजवर 'गझलची दुनिया' ची तीसहून अधिक व्याख्याने झाली आहेत.*
*प्रकाशित साहित्य-*
*भोपाळ(म.प्र.) येथून प्रकाशित झालेल्या ' विश्वकोश शृंखला शब्दकोश' या १५ भाग असलेल्या विश्वकोशाचे मुख्य संपादक म्हणुन काम केले.*(२००८)*रसायनशास्त्र शब्दकोश या मराठी भाषेतील पहिल्या इंग्रजी मराठी शब्दकोशाचे लेखन व प्रकाशन. .(ई.स.२००८)*
"आयुष्य चालताना" हा कवितासंग्रह प्रकाशित*
*(२०१३)*