शुक्रवार, 24 सितंबर 2021

बाबू बिरादार:मोठ्या प्रतिभेचा लेखक

 

बाबू बिरादार:मोठ्या प्रतिभेचा लेखक



बाबू बिरादार हे मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार आहेत हे उशिरा का होईना मराठी जाणकारांना जाणवले ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. अंबाजोगाई येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बैठकीत पुढील संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचा ठराव आला. त्यासाठी काही नावं पुढे आली.परंतु दगडू लोमटे,शेषराव मोहिते,आसाराम लोमटे आणि मी अशा चौघाजणांनी बाबू बिरादार यांच्या नावाचा आग्रह धरला.हे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी कसे योग्य आहे ते पटवून दिले. अखेरीस या नावावर शिक्कामोर्तब झाला. काही वर्षांपूर्वी उंडणगावच्या साहित्य संमेलनात बाबू बिरादार यांची मुलाखत घेतली गेली होती.त्यासाठीही आम्ही विशेष आग्रही होतो.खरे तर बिरादारांना यापैकी कशाचेही आकर्षण नव्हते.आपण सभासंमेलनातून मिरवावे ही गोष्ट त्यांच्या मनाला कधीच शिवली नाही. देगलूर सारख्या सिमावर्ती भागात राहून व्रतस्थपणे लेखन करणारा हा मोठ्या प्रतिभेचा लेखक आहे.काठेवाडी हे या प्रतिभाशाली लेखकाचे मूळ गाव आहे.या गावाचा परिसर,शेती माती,कष्टणारी माणसे,घरे,वाडे,ओढे,वड,पिंपळ अशी वृक्षवल्ली आणि अख्खा निसर्ग या लेखकाच्या कादंब-यांतून येतो. आजपर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलनात  फारसा निमंत्रित म्हणून सहभागी न झालेला परंतु हे संमेलन कधीच न चुकवणारा हा नेक लेखक आहे.पदरमोड करून प्रत्येक साहित्य संमेलनाला हजेरी लावणं,सामान्य श्रोत्यात बसून सहभागी होणं,चर्चा, परिसंवाद गंभीरपणे ऐकणं,नवीन उत्तम पुस्तकं विकत घेणं ही वहिवाट त्यांनी आजवर अबाधित ठेवलेली आहे.आपणाला आवडलेल्या पुस्तकावर तासनतास चर्चा करणं,त्यातील कच्च्या, पक्क्या जागा नेमकेपणानं हेरणं ह्या बाबुरावांच्या विशेष आवडीच्या जागा.आजवर या जागा ते जीवापाड जपत आले.शरफोद्दीन आणि नागोराव उतकर हे खास आत्मीय मित्र बाकी लक्ष्मण मलगीरवार,ऋषीकेश देशमुख, पांडुरंग पुठ्ठेवाड अशा देगलूरातील आपल्या गणगोताशी वाड़मयीन घडामोडींवर, नव्या जुन्या पुस्तकांवर चर्चा करणे ही बाबूरावांची विश्रांतीची जागा.जिल्हा सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा करून निवृत्ती.

बाबू बिरादार हे प्रसिद्धी पासून स्वतःला खूप अलिप्त ठेवतात.आपण मराठीतील एक मान्यवर कादंबरीकार आहोत ही गोष्ट त्यांनी कधीच मनाला शिवू दिली नाही.लेखनाच्या संदर्भात स्वतःला आजमावत राहणं आणि हात लिहिता ठेवणं ही त्यांची लेखननिष्ठा आहे.आपण जे लिहीत आहोत ते साधे,वरवरचे न राहता जगण्याणे अंतस्तर पिंजून काढणे ही लेखक म्हणून आपली जबाबदारी आहे,अशी त्यांची धारणा आहे.

बाबू बिरादार यांनी मातीखालचे पाय,कावड,गोसावी,अग्निकाष्ठ,अंत:पुरूष, संभूती अशा सहा कादंब-या आजवर लिहिलेल्या आहेत.कादंब-यांचे शीर्षक पाहिले तरी त्यातील कथाद्रव्याची आपणास कल्पना येते.या कादंब-यांचे कथानक ग्रामीण पार्श्वभूमीवरचे असले तरी केवळ ग्रामीण कादंबरी या संज्ञापरिघामध्ये त्या मावणा-या नाहीत. माणसाच्या मनाचा शोध घेणे ही लेखकाची लेखनामागील प्रबल प्रेरणा आहे,हे सतत जाणवत रहाते. माणसाचे मन अतर्क्य, गूढ,गमतीदार आणि अस्थिर असते.या अस्थिर मनाचा शोध घेणे आणि माणसाच्या  कृतिप्रणवतेमागील कारणे हुडकत जाणे ही या लेखनाची मूलभूत वृत्ती आहे,असे वाटत रहाते.

खरे तर अत्यंत मोकळाढाकळा स्वभाव असलेला, गप्पांच्या मैफलीत मनापासून बोलणारा,बोलताना आपला देगलुरी ढाचा किंचितही बिघडू न देणारा

बाबू बिरादार हा कादंबरीकार लेखक म्हणून आम्ही गंभीरपणे समजून घेतलेला आहे,असे वाटत नाही. या लेखकाच्या सहा कादंब-यांचा स्वतंत्रपणे विचार केला तर त्याचे सामर्थ्य लक्षात येते.

'मातीखालचे पाय' ही बाबू बिरादार यांची पहिली कादंबरी.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेद्वारे ही कादंबरी प्रकाशित झाली. ज्येष्ठ कवी आणि अनुवादक भगवंत क्षीरसागर आणि विख्यात चित्रकार भ.मा.परसवाळे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगाती प्रकाशनाकडून १९८२ मध्ये ही कादंबरी आली.आंध्र,कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सिमारेषेवरील  वाडी या छोट्याशा गावातील संभाच्या कुटुंबाच्या वाताहतीची कहाणी या कादंबरीत आलेली आहे.या कादंबरीतील रघू हे पात्र दीर्घकाळ मनात रेंगाळत रहाते.रघूचा या कादंबरीतून आलेला मनोव्यापार हा विलक्षण आहे.तो कादंबरीला गतिमान करतो.वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने गावात निर्माण झालेले ताणतणाव लेखक नेमकेपणाने उभे करतो.जातीयतेचे दोर घट्ट असलेल्या काळात माणसाचे जगणे कसे पशूवत होते याचे बोलके चित्र रेखाटतो.रघू आणि माणिक महाराज यांचा या कादंबरीतील संवाद मूळातून वाचला पाहिजे इतका जिवंत आणि प्रत्ययकारी आहे.परंपरा,नियती आणि जगण्यातील धोपटपणा याचे कादंबरीतून आलेले संदर्भ सूचन विलक्षण आहे.

बाबू बिरादार यांच्या 'कावड' या कादंबरीतून वारकरी संप्रदायातील भक्तांच्या व्यक्तीविशेषांची उकल होत जाते. ही कादंबरी पुण्याच्या श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केली आहे.पंढरपूर परिसराचे वर्णन आणि टाळमृदंगात रंगून गेलेल्या व्यक्तीरेखा रेखाटताना लेखकाची लेखनउर्मी झाकून राहत नाही. कादंबरीतील गोरख मास्तर ही कमालीच्या ताकदीची व्यक्तीरेखा आहे.वारकरी मास्तरांचे आपल्या मृदंगावर जेवढे प्रेम आहे तेवढेच रूक्मिणीवर आहे.कमळीचे आकर्षणही तेवढेच आहे.संसार आणि परमार्थ अशा पारड्यांच्या कावडीत मास्तरांचे मन सतत हिंदकळत असते.या कादंबरीतील मास्तरांचा शेवट वाचकाला अस्वस्थ करणारा आहे.भाषेच्या अंगाने या कादंबरीचे वेगळेपण नजरेत भरणारे आहे.



औरंगाबादच्या साकेत प्रकाशनाकडून आलेली'गोसावी' ही कादंबरी एखादी रूपककथा वाटावी इतकी टाळसार आहे.मानवी देहाची मागणी आणि भावकल्लोळांची घुसमट या कादंबरीतून कमालीच्या सामर्थ्याने आलेली आहे. माणसाच्या मनातील अंत:प्रवाह अनेकदा खूप कोरडे आणि शुष्क होतात. मैथुन भावनेचा जेव्हा कोंडमारा व्हायला लागतो तेव्हा वागण्या-बोलण्यातील त-हेवाईकपणा लगटून येतो.गोसावी कादंबरीतील देवकीच्या मनातील अतृप्त इच्छा जेव्हा चेकाळून येतात तेव्हा'देवकीस नवल वाटे.बाहेर झाडापाल्यात देह थंड करणारे पुरूष मठात विंचवासारखे लपून रहातात... तिला आठवे, पहिल्या पहिल्यांदा श्रीपती घाबराघुबरा होऊन अंगामांड्यांना हुंगत राही,नंतर नंतर पांढऱ्या मातीसारखा अंगभर गरम होऊन थंड होता होत नसे.'असे वर्णन केवळ बाबू बिरादार हाच लेखक करू शकतो. कादंबरीकाराने उभी केलेली देवकी ही जिवंत आणि जातीवंय वाटते.तिच्या देहीक गरजा  स्री मनाच्या झाकून ठेवलेल्या कोपऱ्यांना उजेडीत करतात. या कादंबरीतील प्रतिमा आणि प्रतिके समजून घेतली तर कथानकाची खोली लक्षात येते.

पुण्याच्या देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेली 'अग्निकाष्ठ' ही कादंबरी बाबू बिरादार या लेखकाच्या लेखनकक्षा कशा रूंदावत चाललेल्या आहेत आणि मानवी मनाचा तळशोध घेताना लेखक किती समरसून जातो याची साक्ष पटवणारी आहे.वाडीतील भुईराजच्या ब-यावाईट जीवनाची ही कथा आहे.आपल्या पत्नीचा व्यभिचार उघड्या डोळ्यांनी पाहणारा भुईराज बायकोच्या व्यभिचाराला तिच्या इतकाच तिचा नवराही जबाबदार असतो,असे मनोगत व्यक्त करतो,तेव्हा त्याचे दुबळेपण उघडे पडते.परिस्थिती, नियती,स्वभावातील वैगुण्य यामुळे मानवी जीवनात कसकसे ताणतणाव निर्माण होतात,याचे चित्रण 'अग्निकाष्ठ' या कादंबरीतून आलेले आहे.निळकंठ वाणी हा या कादंबरीतील खलपुरूष असून त्याच्या वागण्यातील विद्रुपता कथानकाला गती देते.खरे तर 'अग्निकाष्ठ' ही कादंबरी मराठी कादंबरीला वेगळे वळण देणारी आहे.भाषेच्या दृष्टीने जसे तिचे सामर्थ्य अधोरेखित करता येईल तसाच तिच्यातील सार्वकालीक वृत्ती विशेषांचा निर्देश करता येईल.

बाबू बिरादार यांची 'अंत:पुरूष' ही कादंबरी चालू शतकाच्या आरंभी आलेली आहे.एकेकाळी वतनदारी असलेल्या देशमुखवाडीच्या गोपाळराव देशमुख ही या कादंबरीतील केंद्रवर्ती व्यक्तीरेखा.'गोपाळराव, धनाच्या रांजणावर पिठाची दोरी जरी वळून ठेवली तरी तिचा साप होतो.या देशमुखी वतनावर तुम्ही ही एक सर्प झाला आहात.'हे अम्माचे वाक्य देशमुखाचे पितळ उघडे करते.काळानुरूप बदल हा व्हायला हवा.जुन्या चालीरिती टाकून नव्या डोळ्यांनी जगाकडे पाहायला हवे.पारंपरिकतेतील फोलपणा लक्षात घेऊन वर्तमानाशी जुळवून घेणे यातच पुरूषार्थ असतो अशा प्रकारचे सूचन या कादंबरीतून येते.एकेकाळी चालणारे जमीनदारांचे अधिराज्य, त्यांचे डावपेच,त्यांच्या कडून होणारे गोरगरीबांचे शोषण या सगळ्यांवर कादंबरीतून झगझगीत प्रकाश टाकलेला आहे.मानवी स्वभावाचे बारीकसारीक कंगोरे लेखकाने या कादंबरीतून अचूकपणे टिपलेले आहेत.खरे तर या कादंबरीचा कालावकाश खूप मोठा आहे.एका महाकादंबरीत मावेल एवढे आशयद्रव्ये आहे.गतकाल आणि समकाल याची सांगड घालताना कादंबरीकाराची समाज निरीक्षण आणि आकलनाची शक्ती विस्मीत करणारी आहे.

'संभूती' कादंबरीतील तानी ही व्यक्तीरेखा अत्यंत ठसठशीत असून तिच्या भोवतीच कथासूत्र फीरत रहाते.गावगाड्यातील ब-यावाईट प्रसंगांना सामोरे जाताना स्री म्हणून तिची होणारी तिची फरफट लेखकाने मोठ्या संवेदनशीलतेने कादंबरीतून उभी केलेली आहे.या कादंबरीचा कालपट हा दळणवळणाची पुरेशी साधने नव्हती तेव्हाचा आहे.तानीच्या सोयरिकीचा प्रसंग आणि तिचे वाघजीशी झालेले लग्न यातून तत्कालीन परिस्थितीचे आणि लोकरीतीचे दर्शन घडते.'अधिवास'ही लेखकाची अलीकडेच आलेली कादंबरी आहे.देगलूर येथील गणगोत प्रकाशनाचे पांडुरंग पुठ्ठेवाड यांनी बिरादार यांच्या सर्व कादंब-या नव्याने प्रकाशित केलेल्या आहेत.ही फार मोठी उपलब्धी आहे.

बाबू बिरादार यांच्या कादंब-यांमधून मानवी स्वभावातील गुंतागुंत येते,समाजातील प्रथा,परंपरा येतात,नात्यातील पक्के-सैल धागेदोरे येतात, कधी काळ तर कधी नियतीच्या माध्यमातून खलपुरूष येतो,देहीक असोशी आणि पिडा येतात,कसल्याही प्रकारची कसरत न करता प्रांजळपणे केलेले शारीर वर्णन येते आणि स्वाभाविक बोलली जाणारी पात्रगत भाषा येते.निसर्ग चित्रण करताना लेखक जेव्हा मानवी भावारोपण करतो तेव्हा कादंबरीची भाषा चित्रमयी बनते.त्यांच्या कादंबरीत काहीशी गुढता जरूर आहे.कथानकाच्या प्रवाहात गुढतेचं कवाड हळूहळू उघडत जाते आणि आपण कादंबरीच्या कथाशयाशी एकरूप होऊन जातो.


- डॉ. जगदीश कदम

नांदेड

*****

(औरंगाबाद येथे दि.२५ आणि २६ या तारखांना ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा साहित्य संमेलन संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने बिरादार यांच्या वाड़मयीन वाटचालीचा हा आढावा.)


गुरुवार, 26 अगस्त 2021

सॅन्दोर हालमोसी यांच्या कविता

 

सॅन्दोर हालमोसी

सॅन्दोर हालमोसी यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद
केला आहे, डॉ.संजय बोरुडे यांनी. लौकरच हा अनुवाद साहित्याक्षर प्रकाशनाच्या वतीने  प्रकाशित होत आहे

१. संपूर्ण निरर्थक  
जवळजवळ सर्वच बोलून झाले आहे ..
भूसुरुंगाच्या भोवती फिरताना 
असं क्वचित घडू शकतं,
तुम्ही घाई करु शकता डोळे बंद करुन..
असे आणखी कोणतेही विचार नाहीत
ज्यांचा स्फोट झाला नसता आणि
तुम्हाला मागे ओढायलाही 
कोणीही माणूस नसता जवळ..
*** 

सॅन्दोर हालमोसी प्रमुख अतिथी म्हणून...

२. मार्गदर्शक सूचना
जर पुन्हा वसंताला जाग आली असेल 
तर कोठारे अजूनही असतील तिथे,
एक दीर्घ आलिंगन कोठारांमध्ये
घट्ट रचलेले शून्यांतराचे ढीग त्यावर..
त्यातील सातत्य..
तू त्यात कमरेपर्यंत बुडालेली..
पण मी हुडकून काढील;
                    तुझ्या डोळ्यांतील अश्रू
                    जेव्हा आ?पण बाहेर पडू..
                    तेव्हा तू हसशील जेव्हा 
                    मी रेषा मोडून टाकील..
                     *** 

 ३. किती मजबूत
  तू ते ऐकू शकतेस का?तुला जाणवतेय का? 
  आपले अस्तित्व, दूरदर्शीपणाचे अस्तित्व
 इतके अपरिहार्य,उच्च स्वरातील,ताकदवान
आणि त्याची पकड एकदम जवळ, 
तुलाही न जाणवणारी, तुला वाटतेय की इथे
कुणी नाहीच आहे.. तू स्वतःसोडून
ईश्वराने तुला एकटयालाच सोडलेय 
भित्र्या आणि दुष्ट भावनेने भारलेला
सैतान इथेच आहे , जरी सात्त्विक शक्ती
सर्वत्र जास्त असली तरी ..
प्रत्येक चकाकी प्रकाशापासूनच जन्मते.
पहिली निर्वात पोकळी ,
दोन अणूंच्या मधला अवकाश काही प्रकाशवर्षे दूर... !
प्रचंड वळणाच्या पलीकडे
जिवाणूंच्या राखवृक्षाला 
काळ्याकभिन्न  द्रव्याने 
आणि धूर्ततेने खाल्लेले,
फार वर्षापूर्वी पहिल्या माणसात,
त्याच्याही आधीच्या माणसात,
स्त्रीच्या अधुऱ्या हातातल्या 
अधुऱ्या फळात..
तो शब्द आहे जो तू
उच्चारायची हिंमत करू शकत नाहीस.. !
***
 

सॅन्दोर हालमोसी मध्यभागी..

४. अनेक फळझाडांप्रमाणे 
आपण खूप वेळा फळांची झाडे लावू शकलो असतो
जसे खूप वेळा अयशस्वी झालो तरी  खूप
रोपटी माझ्या कारमध्ये पक्की  बसली असती.
त्या सर्वांशी समरुप मुलांचे चित्र
आणि एक शिल्प.
फळ पिकेपर्यंत शब्द काढून घेणे
त्यानंतर आपण काय म्हणू शकतो?
हलक्या काळजाने पुन्हा
अपमान सहन करू शकला असता,
जो  सौंदर्यापर्यंत पोहोचवील...
*** 
५. तू म्हणजे मी आहेस..
मी नुकताच विचार करत होतो,
तू काय करत असशील आता?
तू कसे सहकार्य करत असशील
पाठदुखीसोबत?
पुराची दुर्गंधी 
आणि उचक्या लागण्याआधी
तू श्वासरहित होताना 
कोणत्या पाठलागाला
सामोरी जात असशील.
प्रत्येक गोष्ट. .प्रत्येक गोष्ट
म्हणजे मला म्हणायचंय की
ना आपण , ना तू , ते सगळे..
तू माझ्या श्वासात  
आत्मा मिसळलास.. तुझ्यात..
कोण म्हणतं, प्रेम विनंती करत नाही
पण ते अस्तित्वात असतं.
तू म्हणजे ते 
ज्याला मी शांतपणे ठोठावले..
*** 

सॅन्दोर हालमोसी डावीकडून तिसरे..
*** 

प्रकाशित झाली ..१६ राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त कथासंग्रहाची 
दुसरी आवृत्ती..















शनिवार, 27 मार्च 2021

गणेश वनसागर: काळ्या मातीतला कलावंत

 

                   Ganesh Vansagar

    गणेश वनसागर हा  नांदेडचा लोककलावंत.काळ्या मातीतला हा कलावंत काल कोरोनाचा बळी ठरला.अवघ्या पन्नासीत तो गेला. ही घटना चुटपूट लावणारी आहे.नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेलं गोळेगाव. हे या कलावंताचं गाव.त्याला शालेय जीवनापासूनच नृत्य आणि नाट्याची विशेष आवड.गणेश वनसागर या कलावंताची पहिल्यांदा भेट झाली कथाकार मित्र दिगंबर कदम यांच्या लोकसंवाद मध्ये.बहुधा ते दुसरे अथवा तिसरे साहित्य संमेलन असावे.

विख्यात लेखिका प्रतिमा इंगोले या संमेलनाच्या अध्यक्ष होत्या आणि आम्ही उद्घाटक होतो.देवीदास फुलारी, नारायण शिंदे,महेश मोरे ही मित्र मंडळी सोबत होतीच.कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी गणेश वनसागरे यांच्या गणगौळणीची झलक झाली. संमेलनाच्या शेवटच्या टप्प्यात गणेशच्या लावण्यांचा कार्यक्रम होता. त्यातील 'या रावजी,बसा भावजी..' या लावणीचा तुकडा त्याने आरंभीच सादर केला आणि आख्खा सभामंडप डोक्यावर घेतला.शिट्ट्या आणि वाहवांचा वर्षाव झाला. 


तेव्हाच या कलावंतामध्ये असलेल्या कला सामर्थ्याची आम्हाला जाणीव झाली. पुढे माळेगाव यात्रा आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक मंचावरून गणेश वनसागर हे नाव ठळक होत गेलं.मात्र दरवर्षी लोकसंवाद मध्ये त्याची भेट ठरलेली.रा.रं.बोराडे,विठ्ठल वाघ,कौतिकराव ठाले पाटील अशा दिग्गजांसमोर त्याने आपली ठेवणीतली लावणी सादर केलेली.दिगंबर कदम यांच्या खांद्याला खांदा लाऊन लोकसंवादासाठी राबायचा.आपली बिनतोड कला पेश करायचा.
गणेश वनसागर याचा कोणी गुरू नव्हता. त्याचा गुरू तोच.स्रीचा पोषाखात जेव्हा तो मंचावर यायचा तेव्हा हा पुरूष आहे हे सांगूनही खरे वाटत नसे.लोकसंवाद मध्ये पहिल्यांदा जेव्हा गणेश नृत्य करायला स्टेजवर आला तेव्हा पंचक्रोशीतील तरुणांनी नर्तकी समजून त्याच्या भोवती गराडा घातला. तेव्हा दिगंबर कदमांना आपल्या खास स्टाईल मध्ये "बापू ही पोरगी नव्हं रे..हुरळून जाऊ नका..पोरगं हाय ते" असं माईकातून पुन:पुन्हा सांगावं लागलं.इतकी बेमालूम वेशभूषा आणि अदाकारी गणेशने सादर केली होती. गणेश स्वतःचा मेकअप स्वतःच करायचा.स्री वेशभूषेसाठी लागणा-या बांगड्या,केशसंभार,कर्णभूषणे,हार,पैंजण,नथ,

काजळ,लिपस्टिक,बुचडा,वेणी,कंबरपट्टा,दंडकडे इ. सर्व साहित्य त्याच्याकडे असायचं.कार्यक्रम सादर करण्यापूर्वी किती तरी वेळ तो आरशासमोर उभा राहून स्वत:ला नटवत असे.आपला मेकअप उत्तम झालेला आहे हे लक्षात आल्यावर हळूच एखादी बट डोळ्यावर उडवत असे.खरे तर गणेशला स्रीपात्र शोभून दिसेल अशी अंगकांती लाभलेली होती. गोरापान वर्ण,टपोरे डोळे,सरळ नाक आणि उंचीपुरी देहयष्टी असलेला गणेश जेव्हा मंचावर यायचा आणि सभागृहाला झुकून वंदन करायचा तेव्हा प्रेक्षकांच्या कडाडून टाळ्या पडायच्या.

गणगौळण,लावणी,भारूड,पोवाडा,कथ्थक हे सगळे प्रकार तो लीलया सादर करायचा. त्याने सादर केलेल्या बैठकी लावणीला वन्समोअर मिळाला नाही, असे कधी झाले नाही.त्याच्या भारुडाने प्रेक्षक मंत्रमुग्ध होत.

गणेश वनसागर हा गुरू नसलेला गुणी कलावंत.जेथे कुठे मंच मिळेल तेथे जाणारा. आपली कला इमानेइतबारे सादर करणारा.कधीच मानधनासाठी अडून न बसणारा. प्रेक्षक,श्रोत्यांचे समाधान हीच माझी पुंजी या न्यायानं नम्र होणारा. या लोककलावंताची दखल ना इलेक्ट्रॉनिक मिडियानं घेतली ना शासनानं. कलेचं शिगोशिग अंग असूनही या लोककलावंताला मोठा मंच गवसला नाही.आपल्या अवतीभोवतीचे किरकोळ कलावंत खूप कांतीमान झालेले दिसतात.परंतु गणेश सारख्या काळ्या मातीतील हरहुन्नरी कलावंताला मात्र व्यापक अंगण लाभत नाही. त्याची कला सर्वदूर जाऊ शकत नाही.ही मोठी खेदाची बाब आहे.

लोककलेसाठी आपलं जगणं सार्थकी लावणारा गणेश वनसागरे हा लोककलावंत कोरोना काळात गेला. या कलावंताला सतत  प्रोत्साहन देणारी आणि अपंगत्वाच्या आधारानं बँकेत सेवारत असलेली सहचारिणी,एक मुलगा आणि एक मुलगी यांना सोडून  या बावनकशी कलावंताने आपली जीवनयात्रा मध्येच संपविली,ही मोठी यातनादायी बाब आहे.

ही कलाप्रांताची मोठी हानी आहे. या बावनकशी कलावंताला

भावपूर्ण श्रद्धांजली!

- डॉ. जगदीश कदम, नांदेड 

गणेश वनसागर यांच्यावरील रिपोर्टची अशोक कुबडे यांची यू ट्यूब लिंक :  https://youtu.be/23-BZ79hlVI


रविवार, 7 मार्च 2021

अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम

 अंधत्वशाली जगाची ब्लाईंडनेस :                                   - प्रतीक महेंद्र कदम 


 


        

अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम 

नोबेल पुरस्कार विजेते 'ज्यूझे सारामागु' यांची 'ब्लाईंडनेस' ही जगप्रसिद्ध आणि गाजलेली कादंबरी आहे. जगातील अनेक भाषेत कादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. मुळची पोर्तुगीज भाषेत असणारी ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन ती परत अनेक राष्ट्रीय भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. यावरूनच आपल्याला कादंबरीची उंची आणि पोहोच समजून येते. कादंबरीची उंची एवढी मोठी आहे की तिची समीक्षा देखील त्याच प्रतीची झाली पाहिजे. मी त्या प्रतीचं लिहू शकेल की नाही, हे माहिती नाही पण हा लिहिण्याचा प्रयत्न आहे.

    एवढी गाजलेली आणि सुप्रसिद्ध अशी कादंबरी एका चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. वाचकाला कादंबरी वाचत असताना आपण एखादी अदभूत कथा वाचत आहोत याचा प्रत्यय सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत होत राहतो किंवा एखादा चित्रपटच पाहिल्याचा अनुभव अनुभवयास मिळतो. नावाप्रमाणेच कादंबरीचं आशय, विषय आगळा-वेगळा आहे. विषय देखील फार किचकट, गुंतागुंतीचा नसून साधा आणि सरळ आहे. पण जेवढा सरळ विषय आहे तेवढ्याच महत्त्वाच्या गोष्टी लेखकाने आपणासमोर आणलेल्या आहेत. अनेक अन्याय्य परिस्थितीत टिकाव धरण्याचे मानवी रूप असेल, माणसातील शारीरिक अभावांमुळे आलेले अधुरेपण असेल किंवा त्याचवेळी होणारा माणसावरील अन्याय, सरकारची चुकीची धोरणं असे बरेच पैलू कादंबरीने उलगडलेले आहेत. 

   

      खूपच रोमांचक आणि वेगळी अशी कथा आहे या कादंबरीची. मुख्य पात्र म्हणजे डॉक्टर आणि त्याची बायको हे दोघे असतात. एके दिवशी अचानक डॉक्टरकडे एक पेशंट येतो. पेशंट अचानक गाडी चालवताना अंध झालेला असतो. डॉक्टर अशा केसचा अभ्यास करत असताना रात्रभर जागतात. सकाळी उठल्यावर तेसुद्धा अंध झालेले असतात. ते ही बातमी मंत्रालयापर्यंत पोहोचवतात. मग त्यांना आणि त्यांच्यासारख्या अचानकपणे अंध झालेल्या सहा लोकांना एका वेड्यांच्या बंद पडलेल्या दवाखान्यात एकत्र जमावतात. बाहेर आर्मीची कडेकोट व्यवस्था केलेली असते. कोणी बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर डायरेक्ट मारण्याच्या सूचना दिलेल्या असतात. ते त्या सूचना अमलात देखील आणतात. एक अंध जखमी झाल्यावर बाहेर मदतीसाठी जातो तरी त्याला आर्मीचे लोक मारतात. एकूणच शहरात ही अंधाची वाढणारी संख्या रोजच वाढत असते. रोज त्या दवाखान्यातले अंध लोक वाढत असतात. त्याचबरोबर जे लोक त्यांच्या संपर्कात आलेले आहेत त्यांना देखील त्याच ठिकाणी ठेवलेले असते. असं त्यांचं बदललेलं आयुष्य सुरू झालेलं असत. अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडतात. पण त्यापेक्षा त्यातून लेखकाला काय सांगायचे आहे हे तेवढेच महत्त्वाचे आहे.

कादंबरीची एक अजून वेगळी ओळख आहे ती अशी की, कादंबरीत एकासुद्धा पात्राला नाव नाहीये. त्यांना नाव फक्त त्यांच्या अंधत्वावरून पडलेली आहेत. म्हणजे पहिला अंध माणूस, म्हातारा अंध माणूस, चकण्या डोळ्याचा अंध मुलगा अशी नावे पात्राला आहेत. संवादांमध्ये अवतरण चिन्ह, स्वल्पविराम असे काहीही नाही. सलग लिहिलेली ही कादंबरी आहे. याचा प्रत्यय आपल्याला कोसला'मध्ये सुद्धा दिसून येतो. ज्याअर्थी लेखकाने पात्रांची नवे सांगितली नाहीत त्याअर्थी यातून लेखकाने एक गोष्ट मांडलेली आहे ती म्हणजे लोक वेळेनुसार, काळानुसार बदलतात, गप्प राहतात, दृष्टी असून अंध असल्याचा दावा करतात. म्हणजे यात कोणतीही जात येत नाही, कोणताही धर्म येत नाही किंवा माणसाचा वर्ण येत नाही. यात येते ती फक्त माणसाची बदलत चाललेली माणसाप्रतिची भावना. यात लेखकाला दुसरा कसलाच आधार द्यायचा नाहीये वा कोणाचाही आधार घ्यायचा नाहीये. माणूस बदलतो तो फक्त त्याच्या नियतीमुळेच त्याची जात, धर्म याला कारणीभूत नसतो हेच यातून लेखकाला दाखवायचे आहे.

   या पुस्तकातून लेखकाने एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे, 'जर तुम्ही पाहू शकता तर पहा, पाहू शकता तर निरीक्षण करा.' हे वाक्य जेवढं साधं-सोपं दिसतंय तेवढं ते सोपं नाहीये. या वाक्यातून अनेक बोध लेखकाने आपणासमोर मांडलेले आहेत. म्हणजे आज अनेक लोक दृष्टी असूनसुद्धा लोक गप्प बसतात. खूप वेळा  लोक चुकीच्या गोष्टी पाहुनसुद्धा न पाहिल्यासारखे करतात. यातून माणसाचा बदलत चाललेला दृष्टिकोन चित्रित केलेला आहे. जागतिकीकरणानंतर जगात गुन्ह्याचे आणि ते पाहून गप्प राहण्याचे प्रमाण वाढले आहे.यासर्व बदलांमुळे माणसातील माणुसकी संपलेली आहे, याचा प्रत्यय कादंबरीत देखील आलेला आहे. या जागतिकीकरणानंतर, जग वेगवान झाल्यानंतर माणसातील भावना कशा बदलत गेल्या, गुन्हेगारीला कसे प्रोत्साहन मिळत गेले हे देखील कादंबरीत मांडलेले आहे. हा आशय कादंबरीत एका वाक्यात खूप छान पद्धतीने मांडलेला आहे.' मला वाटत की आपण आंधळे नव्हतो झालो, तर आपण आंधळे आहोत; आंधळे पण दृष्टीसाहित.  हे खूप महत्त्वाचे वाक्य लेखकाने मांडलेले आहे. या वाक्यातून लेखकाने माणसाच्या काळानुसार बदलणाऱ्या वृत्तीवर कादंबरीच्या माध्यमातून बोट ठेवले आहे. वाचक कादंबरीचा प्रवास करत असताना यासारख्या अजून महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा ती करत राहते आणि वाचकाला सतत गुंतवून ठेवते.

 'या जगात अंध लोक नाहीत तर फक्त अंधत्व आहे' अत्यंत महत्त्वाचं वाक्य आणि तेवढंच खोलवर रुजलेलं देखील आहे. कादंबरीतील एकूण एक वाक्य महत्त्वाची आहेत. यातून जशी लोक अंध असल्याचा दावा करतात तसेच सरकार देखील हेच करते. नकळतपणे सरकार हुकूमशाहीकडे वळत चाललेलं आहे हे आपल्याला दिसत असून आपण याच्याविरुद्ध आवाज उठवायला देखील कोणी तयार नाहीये. सारकरलासुद्धा हे कळत असून ते ही सिस्टीम बदलायला तयार नाहीत. कादंबरीतच बघायचं झालं तर त्यांच्यावर उपचार करण्याऐवजी त्यांना एकत्र क्वारंटाईन करतात. म्हणजे सरकार देखील कसे दुर्लक्षित करते या सर्व परिस्थितीकडे, हे दाखविले आहे. मदत मागायला जाणारा एक अंध त्याला आर्मी मारून टाकते कारण ते त्याला घाबरलेले असतात. त्यांच्या या कृतीवर परत चौकशी होत नाही. याचाच अर्थ असा की सरकार हुकूमशाहीकडे झुकत चालले आहे. एकूणच एकेकाळी समाजकारणकडे झुकत जाणारे सरकार, देश आता जागतिकीकरणानंतर आणि भांडवलशाहीनंतर हुकूमशाहीकडे वळत चालले आहे. हे आपणाला दिसत जरी असले तरी आपण शांत आहोत. सरकार देखील वेळी शांत बसत आहे. जे घडत आहे ते फक्त पाहत बसले आहे. म्हणजे सरकार देखील अंध झालेलं आहे. जसे आधी लोक प्रत्येक हक्कसाठी सरकार विरुद्ध लढत होते, युवक त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरत होते पण आता युवकांमध्ये लढण्याची उमेद नाहीशी होत चालली आहे. लढणारे कोणीच राहीलेले नाहीत. म्हणून विज्ञानाने एवढी प्रगती केली, माणसाचा विकास झाला तरी माणूस म्हणून आपण चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवत नाही आहोत. हेच या कादंबरीत अदभूत कथेद्वारे उभे केलेले आहे.

      पण यासर्व घाबरणाऱ्या वस्तुस्थितीमुळे न मिटणारा माणूस आणि चिवटपणे त्याला तोंड देणारा माणूस देखील लेखकाने दाखवलेला आहे. अशा परिस्थितीत टिकाव धरून राहण्याच्या मानवी क्षमतेचा देखील आढावा या कादंबरीने घेतलेला आहे. या कादंबरीची सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, नेहमीच्या वस्तुमय जीवनातून उसळी मारून दैनंदिन जीवनात आंधळेपणात दडलेल्या लोकांना समोर आणते. " अत्यंत विचित्र तर्हेच्या अन्याय्य परिस्थितीतही चिवटपणे टिकाव धरून राहण्याच्या मानवी चैतन्याच्या अंगभूत क्षमतेचा थांग सारमागूची ही अस्तित्ववादी रुपकथा घेते. या चिरपरिचित संघर्षाचा पुनरशोध लेखकाने त्याच्या सिद्धहस्त शैलीदार वेगलेपणासह घेतला आहे," हे कादंबरीबद्दलचे मत 'दि न्यूयॉर्ककर'ने मांडलेले आहे. म्हणून ही कादंबरी 90च्या दशकातील एक महत्त्वाची कादंबरी म्हणून ओळखली जाते आणि तितकेच महत्त्व तिला आताही मिळत आहे.

लोकशाही राजकारणाचे विशिष्ट संदर्भ, आर्थिक पद्धती आणि सरकारी संस्था, ही कादंबरी अधिक स्पष्टपणे मांडत जाते आणि वरवर पाहता सक्तीचा रीतीने. या जगाचा एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून ही कादंबरी आपणासमोर आणलेली आहे. आजच्या काळातील एक महत्त्वाची आणि तेवढीच बोलकी कादंबरी आहे. वाचताना वाचकाला सोबत घेऊन जाणारी ही कादंबरी सर्वांनी वाचली पाहिजे.

- प्रतीक महेंद्र कदम , टेंभुर्णी, जि. सोलापूर

             संपर्क : ७७७४८३१०८१ 

रविवार, 28 फ़रवरी 2021

बेळगावची कमल बस्ती (बसडी)

 दगडाची_जादू - बेळगावची कमल बस्ती (बसडी)

 

बेळगावात अनेक जैन मंदिरे आहेत.  त्या सर्वांपैकी कमल बस्ती अर्थात (बसडी ) येथील मंदिरे जबरदस्त आहेत. भूमिज शैलीतील या मंदिरांवरील नक्षीकाम, झुंबरं, वातायने प्रेक्षणीय आहेत.

कर्नाटक च्या प्रमुख शहरांमध्ये मोजल्या जाणाऱ्या, बेळगाव शहराला एक हेवा वाटणारा वारसा आहे.  कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामधील सांस्कृतिक मिलाफ या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो.


कित्येक वर्षांपासून बेळगाव येथील ऐतिहासिक महत्त्व असणारी स्मारके पर्यटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करत आहेत.  बेळगाव किल्ला शहराच्या मध्यभागी आहे, आणि किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर दोन तीर्थे आहेत, एक गणपतीला समर्पित केलेली आहे, आणि दुसरे दुर्गा देवीचे.


कमल बस्ती (बसडी): गडाच्या तटबंदी मध्ये कमल बस्ती हे ऐतिहासिक, चालुक्य शैलीचे जैन मंदिर आहे.  या मंदिरात सापडलेली काळ्या दगडाची एक नेमिनाथाची मनमोहक, आकर्षक मूर्ती आहे, इतिहासामधील महान मूर्तीकलेची एक उत्तम नमुना आहे.  


या मंदिराचा उत्कृष्ट भाग म्हणजे “मुखमंडप” असून त्याच्या सर्वोच्च मध्यभागी  कमळ आहे. त्या वरूनच याचे नाव कमळ बस्ती असे पडले आहे. मुखमंडप बघितल्यावर खिद्रपुरच्या कोपेश्वर मंदिरची आठवण आल्याशिवाय रहात नाही.


मंदिरातील घुमट (गुंबज) मध्ये असलेल्या या कमला मध्ये 72 पाकळ्या कमळाच्या रुपात बनविलेले आहे.  प्रत्येक कालखंडातील म्हणजेच भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळातील 24 तीर्थंकर या कमळाच्या फुलांच्या 72 पाकळ्यांवर दर्शविले आहेत.


श्री नेमिनाथ तीर्थंकर कमळ बस्ती ची निर्मिती इ. स. 1204 साली शुभचंद्रा भट्टारक देव यांच्या प्रो्साहनामधून रट्ट राजा चौथा कर्तविर्य यांचे मंत्री बिछीराजा यांनी केले. सध्या लंडन स्थित ब्रिटिश संग्रहालयात असलेल्या बालचंद्रदेव (कवी कांदर्पा) यांनी रचलेल्या दोन शिलालेखा द्वारे या मंदिराबद्दल अधिक माहिती मिळते. या समूहातील दक्षिणमुखी दुसरे जैन मंदिर देखील रट्ट कालीन असल्याचे मानले जाते.



बर्‍याच काळापासून बेळगाव हे जैनांचे एक प्रसिद्ध केंद्र आहे आणि बर्‍याच प्राचीन जैन मंदिरांचे हे घर आहे.  या प्रदेशात जैन मंदिराच्या बांधकामाचा प्रारंभ दहाव्या ते बाराव्या शतकापर्यंत दख्खनमध्ये प्रमुख सत्ताशक्ती असलेल्या चालुक्यांच्या काळात झाला.  अभिनव आणि कलात्मक बांधकामाचा प्रभाव इतर राजवंशांसारखा होयसला, गंगा, कदंब यांनाही प्रेरणा देत राहिला, परिणामी बेळगाव व आसपासच्या परीसरामध्ये अनेक जैन मंदिरे तयार झाली.


भगवान नेमिनाथ यांचे दगडामध्ये कोरलेले सिंहसन अतिशय कलात्मक आहे. मूर्तीला कोरीव कल्पवृक्षाची सुंदर प्रभावळ आहे. मंदिराचे खांब (लेथ कार्विंग) कोरीव कामांनी सुशोभित केलेले आहेत आणि चमकदार आहेत. स्थापत्य कलेचा हा सुंदर आविष्कार मनावर ठसा उमटवणारा आहे. लेथ स्टोन कार्विंग चे तंत्र हजार वर्षांपूर्वी अवगत असणाऱ्या त्या काळा मधील स्थापत्य कलेचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. कोणतेही आधुनिक यंत्र  नसताना, विजेचा शोध लागणयापूर्वी ७०० वर्षे फक्त मनुष्यबळ आणि पशुबल वापरून अशी कलाकृती साकारण्यासाठी किती कुशल आणि प्रवीण कलाकार लागले असतील याचा प्रचंड कोड पडत. प्रत्येक खांबावर केलेले नक्षीकाम कमालीचे एक सारखे आहे. कठीण काळ्या दगडावर कोणीतरी जादूच केली असावी असा भास नक्कीच झाल्या शिवाय राहत नाही. या मंदिराच्या मूर्तींचा आणि इतर पुतळ्यांचा इतिहास इ.स. अकराव्या शतका पासून सापडतो.

कायोत्सर्गाच्या आसनातील भगवान सुमतीनाथां ची आकर्षक मूर्ती, सातफणी असलेल्या नागराजांच्या सावलीखाली भगवान पार्श्वनाथांची मूर्ती, पद्मासन मुद्रामध्ये भगवान आदिनाथची मूर्ती आणि नवग्रह मूर्तीही या मंदिरात दिसू शकतात.


कमल बस्ती(बसडी) ची आज जवळजवळ १०० वर्षे काळजी घेत असलेल्या बेळगाव येथील प्रख्यात दोड्डानावर कुटुंबातील सदस्य राजू दोड्डानावर म्हणतात, शतकानुशतके पूर्वी बांधल्या गेलेल्या या मंदिरातील प्रार्थना कधीच थांबल्या नव्हत्या.  १९४०च्या दशकात ब्रिटीशांनी मंदिरात पूजा थांबवली असली तरी माझे मोठे आजोबा बासप्पा दोड्डानावर आणि माझे आजोबा रामचंद्र दोड्डानावर, प्रार्थना करण्यासाठी लपून एका कोपऱ्यातून वाट काढून पूजाअर्चा करत असत. ”

ते म्हणाले की मंदिराची देखभाल करणारी त्यांची चौथी पिढी आहे.  पुरातत्व विभागाने 1996 मध्ये या मंदिराचे संपूर्ण नूतनीकरण केले आणि मूळ योजना आणि आकार विस्कळीत न करता ते केले गेले. प्रख्यात जैन मुनिंच्या भेटीमुळे अलिकडच्या वर्षांत या मंदिराला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रख्यात जैन संत तरुण सागर महाराज यांनी अनेकदा किल्ल्याच्या ठिकाणी जाऊन प्रवचने दिली होती.  मंदिर व्यवस्थापनाने जैन स्वामींना कमल बसडीच्या आवारात मुनि निवास बांधली आहेत.

ऐतिहासिक मंदिरांचे जतन करणे आणि येणाऱ्या भावी पिढ्यांना हा वारसा सोपवणे खूप गरजेचे आहे. वैभवशाली गौरवशाली इतिहास असलेल्या जैन धर्माची ही मंदिरे वारसा आहेत. तसेच प्रचंड कलात्मक आणि स्थापत्य कलेचा उत्तम ठेवा म्हणून पण अश्या मंदिरांकडे पाहिले गेले पाहिजे. नवनवीन काँक्रिटची मंदिरे उभरण्यापेक्षा अश्या मंदिरांचे जतन करणे ही काळाची गरज आहे. भारतीय पुरातत्व विभागाचे मंदिराच्या संरक्षणासाठी केलेले प्रयत्न नक्कीच दिसतात.

* * * * 

( छायाचित्र सौजन्य : प्रा. अशोक आलगोंडी, बेळगाव ) 

* * * * 



शनिवार, 20 फ़रवरी 2021

मनोहर शहाणे : व्यक्ती आणि वाड्मय

 


शहाणे, मनोहर यांचा जन्म १ मे, १९३० रोजी झाला. वयाची जवळजवळ आठ दशके नाशकात काढल्यानंतर आज ८९ वर्षे वय असलेले शहाणे  पुण्यात स्थायिक आहेत. साठनंतरच्या काळातील मराठीतील ते एक महत्त्वाचे कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार आहेत. नाशिक येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणी वडिलांच्या निधनानंतर आई- आजीने धुणीभांडी करून प्रपंच चालविला. आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिकनंतर शिक्षण घेता आले नाही. शालेय जीवनात वार्षिक स्नेहसंमेलनासाठी 'क्रांती' ही नाटिका लिहिली. नाटकांमध्ये भूमिका, नकला, जादूचे प्रयोग केले. हस्तलिखिते- मासिके चालविली. रेशनिंग खात्यात तात्पुरते काम सुरू असतानाच 'पालवी' मासिक काढले. ही धडपड पाहून 'गांवकरी'त 'मुद्रितशोधक' म्हणून १९४९ मध्ये संधी मिळाली. पुढे साप्ताहिक 'गांवकरी' व दिवाळी अंकाचे 'संपादक' म्हणून जबाबदारी सांभाळली. 

१९५५- ५६ मध्ये डॉ. अ.वा.वर्टीं यांच्या समवेत 'अमृत' नियतकालिकाचे काम सुरू केले. मनोहर शहाणे यांनी 'अमृत'चे 'संपादक' म्हणून भरीव योगदान दिले. मराठी, इंग्लिश व जागतिक वाड़्मयातील ग्रंथांनी त्यांचा मनःपिंड घडला. कुटुंबातील सदस्यांचे मृत्यू जवळून पाहिल्याने शहाणे यांच्या व्यक्तिमत्त्वात संवेदनशीलता, हळवेपणा, तटस्थपणा आणि जीवन- मृत्यूविषयक असंख्य प्रश्न निर्माण झाले. यातून ते गंभीर लेखनाकडे वळले. माणूस, नियती, सुख- दुःखे व त्यांचा मानवी मनावर होणारा परिणाम यावर चिंतन सुरू झाले. "मनुष्य म्हणजे नियतीच्या हातातील बाहुले असून त्याचे अस्तित्व क्षुद्र आहे", हा विचार त्यांच्या लेखनातून प्रकटला. त्यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा सर्वसामान्य असून 'तटस्थ'ता जिवंत, प्रत्ययकारी आणि भेदकतेमुळे साठोत्तरी काळात मराठी कादंबरी जीवनाभिमुख बनविण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. 

 

मनोहर शहाणे  यांचे वाङ्मय विविधस्वरूपी आहे. कथा, कादंबरी, एकांकिका या प्रकारांतून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती केली. त्यांच्या अकरा कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. साठच्या सुमारास नाशकात सुरू झालेल्या 'अनामिक वाड़्मय मंडळा'त सादरीकरणासाठी शहाणे यांनी लिहिलेल्या कथेचा विस्तार होऊन त्यांची पहिली कादंबरी 'धाकटे आकाश' (१९६३) आकाराला आली. जन्म- मृत्यू, वेड- हळवी प्रीती, कामप्रवृत्ती, आर्थिक दैन्य, आजारपण अशा मानवी जीवनातील विविध अटळ सत्यांचे प्रकटीकरण कादंबरीत आहे. कादंबरीतील नायकाचे मनोविश्लेषण चौकटीबाहेरचे व प्रभावी आहे. नवतेची अनेक लक्षणे या कादंबरीत असून ज्या लेखनामुळे तत्कालीन मराठी कादंबरी समृद्ध व प्रौढ झाली, त्यात 'धाकटे आकाश'चाही उल्लेख महत्त्वाचा ठरतो. 'झाकोळ' (१९६५) या दुसऱ्या कादंबरीत पौगंडावस्थेतील मुलाच्या मनोवस्थेचा पट साक्षात झाला आहे. आर्थिक ओढाताण, वैचारिक संघर्ष, वैचारिक स्थित्यंतरे, मनोविश्लेषणाबरोबर दुसरे महायुद्ध, रेशन वस्तूंची टंचाई, काळाबाजार व राष्ट्रीय चळवळी या समकालीन घटनांचा पट कादंबरीतून सूक्ष्मतेने साकारला आहे. नायकाची स्व- जाणीव आणि परात्मता शहाणे यांनी एकाचवेळी लक्षणीयरित्या रेखाटलेली आहे. 'देवाचा शब्द' (१९६८) या कादंबरीत निपुत्रिक नायिका, तिचे जीवघेणे दुःख शहाणे तटस्थपणे रेखाटतात. विचार- अपेक्षा आणि नशिबाच्या पार्श्र्वभूमीवर मध्यमवर्गीय मूल्य स्वीकारातून निर्माण झालेली कोंडी आणि अस्वस्थतेचे प्रभावी चित्रण कादंबरीत आहे. नायिकेची असहाय्यता व दुःख परिणामकारक चित्रणातून कादंबरीतून नव- नैतिकतेचे प्रकटीकरण आहे.

 

'पुत्र' (१९७१) कादंबरीतून वडिलांचा धार्मिक देखावा आणि त्यामुळे कुटुंबीयांची झालेली वाताहत उपरोधिकपणे रेखाटलेली आहे. भावविवशता, सांकेतिकता आणि उपदेशप्रियता टाळत मध्यमवर्गीय जीवनातील कारूण्य उत्कटतेने त्यांनी मांडले आहे. उपरोधशैलीच्या दर्शनबिंदूतून या कादंबरीला नवी परिमाणे लाभतात. 'ससे' (१९७७) कादंबरीतून विकलांग ज्येष्ठ नागरिक आणि त्याच्या मुलीच्या ससेहोलपटीचे चित्रण आहे. 'स्वतःचे जन्मदाते घरात नकोसे होणे' ही आजच्या कुटुंबव्यवस्थेची सर्वांत मोठी शोकांतिका कादंबरीद्वारे समर्थपणे प्रकटली आहे. वृद्धत्वातील दुःख आणि त्याला लाभलेल्या दारिद्र्य पार्श्वभूमीमुळे कारूण्य उत्कट- प्रत्ययकारी पद्धतीने व्यक्त होते. 'लोभ असावा' आणि 'एखाद्याचा मृत्यू' या दोन लघु कादंबऱ्या १९७८ मध्ये आल्या. 'लोभ असावा'मधून स्वप्न आणि वास्तवाचे अनेकमितींचे चित्रण आहे. बंगल्याचे स्वप्न बाळगणारा नायक व्यवहारात फसविला जाऊन स्वप्नभंगाचे आलेले अनुभव तो पत्रातून नेमकेपणाने मांडतो. हे आशयसूत्र संवेदनशील, हळव्या आणि वास्तवाचे भान असलेल्या दृष्टिकोनातून येते. मार्मिक, सूचक, भेदक आणि अंत:र्मुख करणारी ही कादंबरी चटकदार वाक्ये व मौलिक तत्त्वज्ञानामुळे वेगळी ठरते. 'एखाद्याचा मृत्यू'मधून सर्वसामान्य व्यक्ती मेल्यावर प्रकटणारा उपस्थितांचा शोक, आपुलकी निरर्थक व दांभिक असल्याचा अनुभव व्यक्त होतो. उत्तरक्रिया लवकरात लवकर आटोपून मोकळं होण्यावरचा कटाक्ष भयाण अनुभूती देतो. नातेसंबंधातील ताणेबाणे- वाद यामुळे "मृत्यू म्हणजे मानवी जीवनाचे अंतिम- अटळ सत्य" असल्याचेच माणूस विसरून जातो, याची जाणीव ही कादंबरी देते.

 

'इहयात्रा'मधून (१९८६) 'आपण का जगतो आहोत', असा प्रश्न पडल्यावर आत्मशोध घेत इतरांपासून तुटत जाणारा व स्वतःचे अस्तित्व गमावून बसणारा प्राध्यापक भेटतो. एकीकडे अस्तित्ववाद, दुसरीकडे टोकाचे आत्मकेंद्रीपण या दोन द्वंद्वांमध्ये तो समाजसंकेत व सामाजिक बंधने पाळण्यात कमी पडून मृत्यूच्या काठावर पोहोचतो. 'आधुनिक कादंबरी' म्हणून या कादंबरीकडे पाहता येते. 'आरसे' (१९९०) ही लघुकादंबरी वृद्ध आईसह नैराश्यात जगणाऱ्या अविवाहित नायकावर बेतलेली आहे. तो असंख्य प्रश्नांमध्ये अडकून सर्वांशी तुटक- विक्षिप्त व बेफिकीर वागतो. आत्मशोधाचे प्रतीक म्हणून वापरला जाणारा आरसा कादंबरीतून सुत्ररूपाने येतो. 'संचित' (१९९७) ही कादंबरी ब्लॅक कॉमेडी स्वरूपाची आहे. एका श्रीमंताचे विसंगत वर्तन, त्याचा मृत्यू, मृत्यूनंतर जमलेली गर्दी, गर्दीतील वाद- संवाद आणि मागे उरलेल्यांचे विविध प्रश्न यांतून मानवी जीवनाचे अस्तित्व व निरर्थकता अचूकतेने नोंदविलेली आहे. आधुनिकतेचा पेच मांडताना शहाणे त्याला भारतीय सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक वस्तुनिष्ठतेची जोड देतात. मात्र हे मांडताना रूढ- पारंपरिक साधने, तपशील व शैलीत नवनवे प्रयोग करत राहतात. लेखकाच्या अनुभवविश्वाची समृद्धता अभिव्यक्त करणारी ही कादंबरी आहे. एकाचवेळी परात्मता, आधुनिकता, अस्तित्ववाद आणि तात्त्विकता मांडणारी 'नव- कादंबरी' म्हणून 'संचित' मराठी कादंबरीत महत्त्वाची कादंबरी आहे. 'उलूक' (२००५) मध्ये श्रीमंत व्यक्तीला मृत्यूची चाहूल लागल्यावर अमर होण्यासाठीची त्याची चाललेली केविलवाणी धडपड, देवाचे मंदिर बांधल्यावर आपला मृत्यू होणार नाही, ही त्याची भावना फोल ठरून शेवटी येणारा मृत्यू. यातून गूढवाद- अस्तित्ववाद आणि मृत्यूविषयक गंभीर चिंतन प्रकटते. माणूस, त्याचा जन्म, त्याच्या जगण्याचे कार्यकारणभाव व धर्मकारण त्याच्या हातात नसते. आपले बाहुलेपण टाकुन तो स्वत:चे आकाश, क्षितिज निर्माण करू पाहण्याची शक्यता आणि त्यातून निर्माण होणारा अपरिहार्य संभ्रम यावर शहाणे समर्पक- मार्मिक- अभ्यासपूर्ण भाष्य करतात. 

 

मनोहर शहाणे यांनी कथालेखनही केले. त्यातून मनुष्यजीवन, सुख- दुःखे, प्रेम- प्रेमभंग, अस्वस्थता, दारिद्र्य, वेश्या/ भिकार जीवन, ज्येष्ठ नागरिक, मानवी मृत्यू असे गंभीर, भेदक व मार्मिक विषय हाताळले. शहाणेंच्या बहुतेक कथा मानवी जीवन व जगण्यातील, वर्तनातील अस्वस्थपण रेखाटतात. लेखनाची मर्यादा राखत बीभत्सरसाचे दर्शनही घडवितात. 'शहाण्यांच्या गोष्टी' (१९६१), 'अनित्य' (१९८७), 'ब्रह्मडोह' (१९९९) आणि 'उद्या' (२००८) या कथासंग्रहात मिळून एकूण पंचेचाळीस कथा आहेत. 'आरोपी दादासाहेब देशमुख?' (१९९९) हे नाटक आणि 'तो जो कुणी एक' (२००३) यातील चार एकांकिकांतूनही विविध विषय त्यांनी हाताळले. वैविध्यपूर्ण आविष्कारशक्तीचा प्रत्यय त्यांच्या एकांकिका देतात. नाट्यलेखनात ते भेदक, उपरोधिक व थेट संवादी शैली स्वीकारतात. दोन संवादांदरम्यानची जागा तपशिलांनी भरून काढत गरजेनुसार निवेदन करत गती राखतात. 


२००५ साली त्यांना अमेरिकेतून 'महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार' मिळाला. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार त्यांना यापूर्वीच मिळाले होते. शहाणे यांच्या एकांकिकांचे फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत अनुवाद झाले. त्यांच्या 'पुत्र' नाटकास १९७८ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेची सर्व पारितोषिके मिळाली. 'लिटिल मॅगझीन ऑफ इंडिया' या संस्थेचे अध्यक्षपदही भूषविले.  तब्बल पाच दशके 'अमृत' या लोकप्रिय मासिकाचे संपादन केले.

 

मराठीतील प्रयोगशील गद्यलेखक म्हणून गेल्या सहा दशकांत विपुल साहित्यचिंतन आणि कसदार लेखन करणाऱ्या शहाणे यांनी लिहिलेल्या कथा- कादंबऱ्या- एकांकिका गंभीर, तात्त्विक व जीवनासंबंधीचे चिंतन करायला लावतात. वाचकांना स्तिमित करताना माणसाच्या एकूणच जगण्याचा व त्याच्या वर्तनाचा सखोल विचार करतात. मानवी जीवनाचा विविध अंगाने प्रामाणिक शोध घेत राहतात. त्यांनी लेखनातून असंगतता (Absuraity), अस्तित्ववाद (Existentialism), आत्मप्रीती (Narcissism), मृत्यू प्रेरणा (Death Drive), उपरोध (Irony) आणि परात्मता (Allination) मांडली. सहा दशकांत वैविध्यपूर्ण लेखन करून मध्यमवर्गीय - शहरी लोकांचे जगणे, समस्या अस्वस्थता आणि मनोवृत्तीचे प्रभावी चित्रण केले. मळलेली वाट नाकारून मानवी जगण्यातील अर्थ गांभीर्याने शोधला. शहाणे यांचे लेखन वास्तव, भेदक, प्रत्ययकारी, चिंतनशील व अधिक परिणामकारक असून साठोत्तरी वाड़्मयातील त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.

 

डॉ. राहुल अशोक पाटील,

भ्रमणध्वनी: ९८९०८७२४२६

मेल: rpatil766@gmail.com

बुधवार, 17 फ़रवरी 2021

मुंबई, बंबई, बॉम्बे : LBGT चे संदर्भ

 




' मुंबई मुंबई बॉम्बे ' हा  डॉ.बाबासाहेब यांचा सुमारे १३३ पृष्ठांचा कवितासंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केला असून त्यात सुमारे ११४कविता आहेत. अरुण कोलटकर,नामदेव ढसाळ थेट अरुण म्हात्रे पर्यंत अनेकांनी मुंबई आपापल्या पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते सारे कवी मुंबई येथे राहणारे होते .बाळासाहेब लबडे यांच्या निमित्ताने मुंबईकडे पाहणाऱ्या  परंतु मुंबई येथे वास्तव्य नसणाऱ्या  कवितेचे आकलन आलेले आहे. शिवाय प्रथमत : च  आलेले आहे .म्हणूनच हा कवितासंग्रह महत्त्वाचा आहे .
  मुंबई एक महानगर आहे म्हणूनच महानगराची वैशिष्ट्य अर्थातच मुंबईलाही लागू होतात उदाहरणार्थ व्यामिश्रता ,जटिलता ,आर्थिक विषमता, चंगळवाद, बेकारी, श्रमिक,झोपडपट्ट्या, व्यावसायिक संबंध व  स्पर्धा ,विभक्त कुटुंब, गर्दी, भाईगिरी, लोकसंख्येची घनता , प्रदूषण गटारी, वेगवेगळ्या बोली इत्यादी.
   वारंवार पडणारे दुष्काळ आणि बेरोजगारी यांना कंटाळून शहराकडे स्थलांतरित होण्याचे प्रमाण सर्वदूर
शहरंसुजली किती महानगरात रूपांतरित होतात. महानगर म्हटले की एकीकडे सुबत्ता पोस्ट इमारती बंगले नागरी सुविधा आल्यात तर दुसरीकडे दारिद्र्य, बकालपण आणि एक आगळे  अधोविश्व आलेच.
विश्वाची व्याप्ती अर्थातच मोठी आहे. स्लम एरिया, गटारी, फुटपाथ, पडीक जागा, इमारती, पुलाखालच्या जागा ,मुताऱ्या ,सार्वजनिक संडास, गलिच्छपणा आणि त्यासह तिथे राहणारी कुटुंबे आणि त्यांच्यातील आपापसातली चकित करणारे आंतरसंबंध,अनेक प्रकारचे लोक, त्यांचे नातेवाईक ,व्यवसाय वगैरे सर्व बाबी त्यात येतात.
लोकलमध्ये किंवा ट्रॅफिक सिग्नल पासिंग भीक मागणारे, पैसे मागणारे तृतीयपंथी आपल्याला दिसतात .तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकासा निकोप नाही. तेही या अधोविश्वाचा भाग करतात आणि ट्रान्सजेंडर हेही या समाजाचा भाग असतात. या सर्वांना एकत्रितपणे 'एलजीबीटी 'असे संबोधले जाते लेस्बियन म्हणजे समलिंगी संबंध ठेवणाऱ्या  स्त्रिया. होमोसेक्स हे ज्यांचे वैशिष्ट्य म्हणजे आपापसात समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष, बायो  म्हणजे स्त्रिया व पुरुषांशी संबंध ठेवतात असे लोक , ट्रान्सजेंडर्स म्हणजे असे लोक जे विरुद्धलिंगी लोकांचे कपडे घालतात आणि आपले चुकीच्या  लोकांशी संबंध  आहेत असे वाटणारे लोक होत.
  एलजीबीटी समूहाबद्दल च्या कविता डॉक्टर लबडे यांच्या संग्रहात आहेत. अशा कवितांची संख्या एकूण आठ भरते. कोड लैंग्वेज (पृ. १२) महालक्ष्मी ( पृ. १८) एम.जी.गार्डन : एक अपूर्ण वर्तुळ ( पृ. ४६)निर्मलनगर :एक अंधारातील चळवळ (पृ. ५१)भाईंदर व्हिडिओ सेंटर (पृ. ६८)हिरानंदानी च्या चौथ्या मजल्यावर ( पृ.७७)रूमबॉयसाठी दोन अटी ( पृ.७८) राघव चिल्ला  गली में (पृ.८४) कॉल करा (पृ.८८) नॉर्मल लोग (पृ.११३) अशा या कविता आहेत.
   रेल्वे स्टेशन प्लॅटफार्म हेच घर समजणारे काही लोक 'कोड लँग्वेज' या कवितेत येतात .त्यांच्या आपापसातल्या संबंधांवर भाष्य करताना डॉक्टर लबडे म्हणतात की

काळे डगले हसले भोगात कोणी फसले
नागड्यांच्या फलाटांचे अभंग सारे नासले

कोड लैंग्वेज याचा अर्थ गूढ किंवा सांकेतिक भाषा.
'हुक्का पिण्यासाठी अंधेरीला जाऊ ' किंवा 'कोळी अम्मा चिरीमिरी ' , 'झिंगऱ्या सिगारेटवाला ', ' चकना डांसबार ' इ. संकेतांना काही एक विशिष्ट अर्थ आहे.
  एलजीबीटी च्या जगात ' गिगेलो ' या संज्ञेलाही एक विशिष्ट अर्थ आहे. 'गिगेलो ' म्हणजे पुरुष वेश्या.कॉल गर्ल्स किंवा धंदेवाईक बायकांप्रमाणे हे पुरुष नटून - थटून, सजून उभी असतात. त्यांचे पिकअप पॉइंटस् ठरलेले असतात.तिथे त्यांचे गिऱ्हाईक अर्थात स्त्री ग्राहक येतात.या  व्यवसायातही करिअर आहे. सुजीतची आई म्हणत राहते, 'आमचा सुजित ऑफिसला जातो. ' परंतु वास्तविक तो महालक्ष्मीच्या पिकअप पॉइंटला गिऱ्हाइकांची वाट पाहत , 'गिगेलो ' म्हणून उभा म्हणून असतो

किती श्रद्धेने बाया
घेत राहतात
दर्शन महालक्ष्मीचे
सुजीत उभा असतो,
सजून धजून
हातात बॅग घेऊन वाट पाहात
एखादी गाडी थांबेल
जी घेऊन जाईल आपल्याला..

यातून मुंबई नावाच्या मायानगरीचे एक आगळे रुप दिसून येते.' रात्रभर कालची श्रीमंत बाई पोराला चावत होती ' हे वास्तव आपल्याला धक्कादायक, स्तिमित करणाऱ्या जगात घेऊन जातो मध्यमवर्गीय जाणिवा, संकेत यांना धक्का देणारी ही गोष्ट डॉ. लबडे या कवितेत मांडतात.
मुंबई येथील एम.जी. गार्डन हा एक विशिष्ट स्पॉट आहे. निम्म्या भागात क्रॉसड्रेसी (म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीचे कपडे घालणारे लोक) त्यांना तृतीयपंथीयांच्या जगात 'साटला ' म्हणतात ;ते लोक फिरत असतात. शरीरात अडकलेले भिन्नलिंगी व्यक्तिमत्व म्हणजे एक प्रकारच्या अपूर्णता.ह्या अपूर्णतेमुळे न्यूनगंडाने पछाडलेले लोक या गार्डनमध्ये आपल्या सुखाचा शोध घेतात. उरलेल्या अर्ध्या भागात नॉर्मल म्हणवल्या जाणाऱ्या लोकांच्या बायका या बायकांच्या रुपातले पुरुष कसे दिसतात ते उत्सुकतेने पाहतात मानवी जगण्याची ही दुसरी आणि गुड बाजू डॉक्टर लबडे खुबीने मांडतात.
भाईंदरच्या अरुंद बोळीत सांगणारे व्हिडिओ सेंटर त्याच्या स्क्रीनवर ब्ल्यू फिल्म चालू आणि प्रेक्षकांनी शेजारी बसलेले तृतीयपंथी, एक वडापाव सौदीमध्ये वाटून खाणाऱ्या कोट्या एकमेकींना आग्रह करत राहतात.समोरच्या स्क्रीनवर पाहून तसेच कृती करणारे प्रेक्षक आणि कोत्या यांचे चित्रण 'भाईंदर व्हिडिओ सेंटर ' या कवितेतून डॉ.लबडे यांनी केलेले आहे या को त्यांना छक्का संबोधले आवडत नाही अशावेळी त्या हमरीतुमरीवर येतात ही हमरीतुमरीवर देण्याची पद्धतही वेगळी आहे. सगळे हिजडे पोट आणि टिऱ्या बडवायला सुरुवात करतात. त्यांचा आवेश पाहून मर्द लोकही काढता पाय घेतात .
फाईव्हस्टार हॉटेलमधल्या रुम साठी सर्विस देणार्‍या रूमबॉयचे जगही आगळेवेगळे आहे.  चमडीचा धंदा चालणाऱ्या त्या हॉटेलमध्ये पोटासाठी राबणारे हे रूम बॉय आनंदाने काम करत राहतात, हॉटेल मालकाच्या दोन अटी मान्य करतात. पहिली अट म्हणजे गिऱ्हाईक सांगेल तसे करायचे आणि दुसरी अट म्हणजे टॉयलेट साफ करायचे.वरवर वाटते तितके सोपे नाही. एखाद्या श्रीमंत बाई सोबत झोपणे आणि एखाद्या समलिंगी व्यक्तीला खूश करणे, अशा दोन्ही प्रकारे हा रुम बॉय वापरला जातो. त्याचे मन ,भावना, विचार यांचा अर्थातच चोळामोळा होतो, हे सांगणारी अत्यंत धक्कादायक अशी कविता या संग्रहामध्ये आहे.
' सर्चिंग सर्चिंग हल्लागुल्ला ' अशी ऱ्हिदम असलेली कविता यात आहे.याही कवितेमध्ये  तृतीयपंथीयांचे विश्व आपणाला दिसते. तृतीयपंथी व्यक्ती जेव्हा 'त्या ' समाजाचा घटक होते तेव्हा तिला गुरु करावा लागतो. मग विधिवत दीक्षा घ्यावी लागते, निर्वाणा करवून घ्यावा लागतो. मग  त्याला देह व्यापारामध्ये पहिली सुहागरात मनवावी लागते .सोनी सारखा पार्श्वभागाचा पहिल्यांदा वापर झाला की  'बट्टी होई अलबेली ' हा वाक्प्रचार वापरला जातो या कवितेत तृतीयपंथीयांची बोली आलेली आहे त्यातील काही शब्द पुढील प्रमाणे आहेत -
साटला - मुलींचे ड्रेस घालणे
चपाती - निर्वाणा केलेल्या पुढचा सपाट भाग
कुकरची शिट्टी - पहिल्या रात्रीचे साफल्य
बट्टी - पार्श्वभाग
धोरुन - निजून
कोमथा - मुखमैथुन
मरसा- विधवा झालेला तृतीयपंथी
डॉ.लबडे यांनी या विश्वाचा किती खोलवर अभ्यास केला आहे ते यावरुन दिसून येते.
' राघव चिल्ला गल्ली में ' ही कविता पूर्ण कोती बोलीत आहे. रेड लाईट एरियाची भाषा या कवितेत दिसते.

पक्या, रंग्या, दिन्या झाडू | पार्टी कितना मारेला I
चिकण्या बोतल पाडू | मालेमाल भी होरेला I

शंकऱ्या थोडा बीमार I गोली गोलीच खारेला
मस्त टाकाच भिडेला | ऐटम गिफ्ट देरेला |

विसक्या तेरा नसीब | लडका बोल लडकी I
जो बी आय मारने का I दूर करेंगा कडकी I

' लडका बोल लडकी ' या ओळीतून दोन्ही प्रकारचा माल उपलब्ध असल्याचे सूचन होते. मुताऱ्यामध्ये, रेल्वेच्या डब्यात, ' फुल सॅटिफॅक्शन 'च्या नावाखाली काही मोबाईल नंबर दिलेले असतात .हे नंबर आपल्याला साद घालतात . लैंगिक भुका भागवण्यासाठी माणसं तिकडे जात असावीत. यामध्ये तृतीयपंथी, बायो, गे, लेस्बियन या सर्व गटातील लोकांचा समावेश असावा.म्हणून तर हे नंबर एसटी स्टँड,, लोकल , मुतारीअशा सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले आढळतात.
टाळ्या वाजवून भीक मागणारे हिजडे हा नेहमीचा अनुभव आहे. दोन-चार टाळ्या . नखरा बिखरा, कमरेत लचकून अचकट विचकट बोलणं  हे त्यांचे  वैशिष्ट्य. भडक मेकअप करून ' भोनीका टाईम है जादा मचमच नै हा ' असा धमकीवजा इशारा सर्वसामान्य लोकांच्या मनात दहशत पैदा करतो.
' पैसे नाही दिले तर हे लोक खूप मारतात 'शेजारचा कोणीतरी पुटपुटतो. एखादा मिलिटरीवालाही दहा रुपये देऊन सटकू पाहतो. पैसे देणाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला दुवा देणारा हिजडा तोंडातल्या तोंडात पुटपुटतो हे पाहून शेजारची बाई पटकन बोलून जाते,'नॉर्मल लोगों से तो मुझे येच लोग अच्छे लगते है' अशा प्रकारे डॉ. लबडे यांच्या कवितेत LGBT  लोकांचे संदर्भ येतात. एकंदर मुंबईसारख्या महानगराची लय, नस पकडण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.  नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा ' मध्ये ' हिजडे झगे वर करून नाचताहेत ' किंवा 'रंडकी पुनव' असे  तृतीयपंथीयांच्या जगातले संदर्भ येतात.त्यानंतर कैक वर्षांनी ते थेट डॉ. लबडे यांच्या कवितेत येतात,त्यापलीकडचे विश्वही येते ही गोष्ट निश्चितच दखलपात्र आहे.

****

- डॉ. संजय बोरुडे,
२१ अ, अमन, एकता कॉलनी,
गोविंदपुरा, अहमदनगर, ४१४००१
मोबा.९४०५०००२८०

****

साहित्याक्षर प्रकाशनाकडून येत असलेला नवा कवितासंग्रह.जागतिकीकरणात मानवी अस्तित्व आणि संघर्ष या बद्दल नवी प्रमेये मांडणारा कवितासंग्रह. चळवळीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारा संग्रह..

विदर्भातील सशक्त कवीचा कवितासंग्रह

आ रं भ बिं दू  - अजय खडसे







गुरुवार, 4 फ़रवरी 2021

HAUJ KATORA,ACHALPUR

 


                 Hauj Katra, Achalpur  

Achalpur is famous for the capital of Imadshahi... It contains so many historical places as well as monuments. One of the most important monument  is HAUJ KATORA a mile away from the town .
  It is built by Allauddin Imadshaha. (Ref.1)
  It is located in the north- west direction & 4 kms away from Achalpur. The area where this monument is located is described as 'Buraka'.

 
With my friend , Gajanan Mate 

 Actually it is a octangal MINAR. It had 5 Floors. But now only 3 are remained. It is as  similar  as The Tomb of Salabat Khan at Ahmednagar which is wrongly described as Chandbibi Mahal. 

Chandbibi Mahal (Tomb of Salabat Khan),Ahmednagar 

   Hauj Katora is built with sand,bricks, Kharap (trench) & Limestone. There is an artificial Iake created & in the middle of the lake the monument get created. (Ref. 2) The diameter of  this building is 91 Meter i.e. 100 Yards. The height of each floor is 4.572 Meter i.e.15 feet. 


Inner structure 

                 Outer  design & Structure

The water was supplied by a Nahar (Canal) from Dev Lake of Gawilgad. It was also supplied to Navbagh & TufalKhan's Mahal in Dabirpura. (Ref.3).. There  were so many flowers & types  of lotus in  the lake around the monument. Hauj Kator a contains so many Chaukes, Air Conditioned Rooms & Maherabs (Ref.4). It is having beautiful carvings. It was having Minars at the time of Akbar.

Octangal Shape

  It contains 8 Arches & doors. There was a pillar which was 81 feet high where the other Minars were located. It was also having an underground bunker. The building Contains beautiful doors with Maharab & decorated with the beautiful pictures. (Ref.5).

                               Inner Arch 

    The inscription on the Minar is having the meaningful words which means , 'jamadi all awl 1199 Hijari Nawab Ali kh.av & Nawab  jafaruddola Bahadur Iteshamjang came here with Nabab Ibrahim Khan (Ref.6) Now it  is destroyed. It is said that Nabab used to come here with his wife in Summer. Therefore it is also called as 'Jal Vihar Mandir'
    It is said that the monument had 6 floors. Out of which 2 floors Nabab took with him to build his Mahal. Thus he decreased the pressure of the monument. It is also said that this particular monument is having somewhat contact with Sat Budkhi (Seven Wells) near Achaalpur.
    Now the age of the monument is 600 years. But the archaeological department has no time to pay attention.

- Dr. Sanjay Borude, Ahmednagar
- 9405000280



• References :

1. Purandare G. M.- ElichPur- Nagpur Times, 26 Jan 1991
2.केतकर श्री.व्यं. महाराष्ट्रीय ज्ञानकोष, वि. ९, पृ. ४९
3. काळे या. मा.वऱ्हाडचा इतिहास , पृ.३०७
4. Rabbani - Achalpur Tarikh aur Takhafat , Page 52
5.काळे या. मा. उ.नि., पृ. ३०७
6. अमरावती मंडल ईद विशेषांक, पृ. ९

Author : Dr. Sanjay Borude 

बुधवार, 20 जनवरी 2021

सातारा जिल्ह्यातील कामशिल्पे असणारी मंदिरे

सातारा जिल्ह्यातील खटाव’ तालुक्यामध्ये ‘खजुराहो’ची कलाकृती





मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. सर्वसमावेशक भारतीय तत्वज्ञानाची मूक साक्षीदार असलेली ही मंदिरे आपल्या समृद्ध कलेइतिहासाचा वारसा असून, यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्रात तर हा ठेवा खेडोपाडी विखुरलेला आहे. त्यास सातारा देखील अपवाद नाही. सातारा जिल्ह्यातही अनेक प्राचीन मंदिरे, किल्ले, गड अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आजही आपले अस्तित्वटिकवून उभ्या आहेत. मध्यप्रदेशातील खजुराहो येथील हजारो वर्षे जुनी असलेली मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत.खटाव तालुक्यात गुरसाळे येथील रामेश्वराचे मंदिर, कातरखटाव येथील कात्रेश्वराचे मंदिर व सातारा तालुक्यातील परळी येथील केदारेश्वराचे मंदिरही अशाच प्रकारच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.



या मंदिरांवर कोरलेल्या कामशिल्पांमुळेच ही मंदिरे महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून अल्प परिचित आहेत. मंदिरावर कामशिल्पे का असावीत, याबाबत संशोधकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. परंतु ही मंदिरे तांत्रिक उपासना सांप्रदायाच्या प्रभाव असणाऱ्या काळात उभारली गेली, यावर बहुतांश संशोधकांचे एकमत आहे. मद्य, मांस, मस्य, मुद्रा व मैथुनी या पाच गोष्टींना मिळून पंचमकार अशी संज्ञा तयार होते. याच गोष्टीचे वा उपासनामार्गाचे शिल्पांकन साताºयातील या तीन मंदिरांवर केलेले आढळते.जिल्ह्याला या मंदिरांच्या रुपाने ऐतिहासिक वारला लाभला आहे. अनेक दशकांपासून उभी असलेली ही मंदिरे साता-यातील खजुराहो म्हणून ओळखली जातात. सध्या काही मंदिरांची दुरवस्था झाली आहे. हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.गुरसाळेतील पुष्करणी वैशिष्ट्यपूर्णगुरसाळे येथील रामेश्वर मंदिराचे छत मोठ्या दगडी शिळांचे बनलेले आहे. बाजूच्या भिंती आतून बाहेरून सपाट आहेत तर दर्शनी बाजू अलंकृत आहेत. मंदिराच्या बाहेरील दर्शनी बाजू पाने, फुले, वेगवेगळ्या भौमितिक रचनाच्या थरांनी सजवलेल्या आहेत. 




यातीलच सर्वात वरच्या थरात कामशिल्पांचे चित्रांकन केले आहे. या शिल्पात युगूल शिल्पे, मैथून शिल्पे, वेगवेगळ्या कामक्रीडांचे चित्रण असलेली शिल्पे आहेत. या मंदिराच्या प्रांगणात असणारी पु्ष्करणी हे आणखी एक वैशिष्ट्य. पुष्करणी किंवा बारव म्हणजे चौकोनी आकाराचा उतरत्या पायºयांची रचना केलेले कुंड.कात्रेश्वरातील कन्नड शिलालेखकातरखटाव येथील कात्रेश्वराची रचना देखील गुरसाळ्याच्या रामेश्वर मंदिरासारखीच आहे. फक्त याच्या समोरील पुष्करणी थोडी बाजूला आहे. कात्रेश्वराच्या मंदिराची व पुष्करणीची सध्याची अवस्था अतिशय बिकट आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील शिल्पपटाचेदेखील नुकसान झाले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असणारा कन्नड शिलालेख. तो देखील भग्न आहे. 


हजार एक वर्षांच्या इतिहासाच्या मूक साक्षीदार असणाºया विरगळी, नंद, भग्न मूर्ती मंदिर परिसरात उघड्यावर विखरून पडल्या आहेत.परळीतील शिल्पे सुस्थितीतसज्जनगडाच्या पायथ्याशी वसलेल्या परळी गावात असलेल्या केदारनाथ मंदिराची रचनाही रामेश्वर मंदिराप्रमाणेच असावी. मंदिराच्या छतास मोठमोठ्या शिळा वापरल्या आहेत. परंतु त्यांचाच भारामुळे खालच्या दगडी तुळ्या भंगल्या आहेत. त्याच्या आधारासाठी जागोजागी बाजूच्या भग्न मंदिराचे खांब वापरले आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला बाह्यांगावर असणारे नक्षीकाम, कामशिल्पे इतर मंदिरापेक्षा सुस्थितीत आहे.सौजन्य लोकमत


माहिती व फोटो साभार - 

- रामकुमार शेडगे 

    वाडे गढी गडकोट ऐतिहासिक वास्तू इतिहासाचे मूक साक्षीदार ©