वसंत मुरदारे नावाचा अलक्षित कवी
वसंत मुरदारे ,7666346415
प्रतिभासंगम साहित्य व संस्कृती मंच च्या वतीने मी अनेक कविसंमेलनाचे आयोजन करायचो, त्या प्रत्येक कार्यक्रमाला शेवगावचे ज्येष्ठ कवी वसंत मुरदारे आवर्जून उपस्थित रहायचे.. या कार्यक्रमातूनच संदीप काळे ( पाथर्डी ), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी) यांसारखे नवे कवी पुढे आले. साम टीव्हीचे निवेदक दुर्गेश सोनार (पंढरपूर) यांना उमेदीच्या काळात आमच्या मंचाने खूपदा बोलावले. ऐश्वर्य पाटेकर (नाशिक) तेव्हा विद्यार्थीदशेत असताना इकडे नेहमी यायचा. या गोष्टीला विजय नांगरे (चांदा), रामदास सोनवणे ( घोडेगाव ), रामकृष्ण जमदाडे (खडका फाटा), कैलास गडाख (सोनई), दत्ता साकोरे (निमगाव म्हळुंगी)यांसारखे अनेक लोक साक्षीदार आहेत. त्यावेळची कात्रणे, फोटोही उपलब्ध आहेत.
साधा शर्ट आणि पॅन्ट असा पोशाख असण वसंतरावांनी कधी कुणाच्या कुचाळक्या केल्याच्या मी पाहिल्या नाहीत. अनेक प्रतिष्ठित मंचावरून आपत्या कविता ऐकवताना स्वत : ला अहंकाराचा वारा लागू दिला नाही. मुक्तछंदातील असो वा लयीतली कवित त्यांचे सादरीकरण लक्षवेधी आणि लक्षात राहणारे असायचे. शेवगाव ग्रामपंचायतच्या जकात नाक्यावर काम करणारे मुरदारे यांची आर्थिक स्थिती जेमतेम असली तरी महाराष्ट्रभर चांगले मैत्र जपले आहे. कवितेच्या प्रमोशनसाठी कुणाकडेही लाळघोटेपणा न करता आपली कविता ते व्रतस्थपणे जपत राहिले.आजच्या पिढीला कदाचित वसंतराव ठाऊक नसतील . पण सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की, त्यांच्या कविता वाचून तत्कालीन साहित्य रसिक मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना पत्र पाठवले होते आणि 'अनुष्टुभ' ने ते प्रकाशित केले. यावरून त्यांच्या कवितेचा दर्जा लक्षात यायला हरकत नाही.
यशवंतराव गडाख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या हस्ते वसंतरावांचा सत्कार करण्यात आला होता. वसंतरावांचे दोन कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकअशित झाले आहेत. त्यापैकी 'बोभाटा' हा कविता संग्रह रसिकांच्या आजही लक्षात आहे. पुढे त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चक्क शेवगाव येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांचा 'तेच लोक होते' हा कवितासंग्रह प्रकाशित केला. त्यात मारवाडी, मराठा अशा सर्व जातीचे व्यापारी होते. मला वाटते, महाराष्ट्राच्या साहित्यविश्वामधली, ग्रामीण भागातली ही एकमेव घटना असावी. अनेक कविसंमेलने गाजवणाऱ्या वसंत मुरदारे यांच्या निवडक चार कविता या निमित्ताने आपल्या पुढे ठेवतो -
वसंत मुरदारे यांच्या कविता
१.
तेच लोक होते
माझ्या पाठीवर मायेचा हात फिरवणारे
त्यांच्याच हातातले धारदार सुरे होते
माझ्या पोटात खोल खोल वार करणारे
तेच लोक होते
माझ्यावर फुले उधळणारे
त्यांच्याच फुलांत जहरी नाग होते
मला जागोजाग दंश करणारे..
तेच लोक होते
मला वाकून नमस्कार करणारे
त्यांच्या नमस्कारातही जादुई चमत्कार होते
माझ्या मानेला जिथल्या तिथं मुरगाळणारे..
तेच लोक होते
माझ्याशी गोड गोड मधाळ बोलणारे
त्यांच्या गोड बोलण्यातही शिव्याशाप होते
मला पूर्णत:रसातळाला पोहोचवणारे...
तेच लोक होते
माझ्या गुणांचे गोड गोड कौतुक करणारे
त्यांच्या कौतुकातही कुटील षड्यंत्र होते
मला मृत्यूच्या खाईत जखडविणारे...
तेच लौक होते
माझ्या मढ्यावर ओक्साबोक्सी रडणारे
त्यांच्या रडण्यातही भेसूर सूर होते
मला जिवंतपणीच सरणावर चढविणारे..
तेच लोक होते
माझ्या राखेतल्या अस्थि गोळा करणारै
अस्थि गोळा करण्यातही त्यांचे वितंडवाद होते
माझी राख दाखवून स्वतःचे पोट भरणारे..
२.
जुना कष्टाचा म्हातारा बैल मेला
दूरवरुन गिधाड उडत आले
मीठ घालून त्याला शेतात पुरावे म्हटले
तर नुस्तेच हाडाचे सांगाडे उरले..
रक्तपिपासू प्राण्यावर
नको तितके विष फवारले
वासानं जनावरच मेले
गोचीड मात्र जिवंत राह्यले..
करकुंजाचे असंख्य थवे
टोळधाडीसारखे भुईवर आले
बिचाऱ्या भर जवानीतल्या करडीचे
नाहकच इज्जतीचे पंचनामे झाले..
घडोघडीला रंग बदलणारे सरडे
एवढे कसे शक्तीशाली बनले..
न जाणो त्यांच्या अंगात
कुणा नेत्याचे बळ शिरले..
हौसेखातर पाळलेले मांजर
एवढे कसे नेभळट निघाले
राजरोस घरातले उंदीरदेखील
त्याच्या अंगाखांद्यावर लोळू लागले..
खाऊन खाऊन लठ्ठ झालेले कुत्रे
एवढे कसे मुजोर बनले
आता भाकरीच्या तुकड्यावरही ते
खुशाल वर तंगडी करु लागले..
काळे कुळकुळीत लोभी कावळे
एवढे कसे व्यवहारी बनले
पिंडाला शिवायचेही
ते आता पैसे मागू राह्यले..
हे कुठले लफंगे लोक
नको त्याला पुष्पहार घालू लागले
देवळात कधीपासून देव
बिचारे पानाफुलांसाठी तरसू लागले...
३.
चांद चांदोळ्याच्या राती
असा वारा थरथरतो
पदराआधी
माझ्या ऊरीचा पाचोळा
त्याच्या नभाळी गरगरतो...
तुझी सय आली
लय वाऱ्याची होऊन
कसा उफणू जोंधळा
माझ्या पापण्यांच्या टोपलीत
तू बसला जोंधळा होऊन...
४.
ताटाला हुडहुड /कणसाला लुडबूड /शिवारी पाखरु बिंगबिंगला...
मोटेची खडखड/थारोळं गडगड/कांद्याचा डेंगळा डेंगडेंगला...
भल्लरी दुडदुड /पाथीचं थुडथुड/सूर्य गं कासरा वरवरला
कासोटा तड्तड्/विळ्याची वढवढ/बुचुडा ताटाचा चरचरला
झुडुपात झुडझुड/चित्तर तुडतुड/गोफणीनं दगड वंगवंगला
खुरुडं खुडखुण/पिलाची ऊडऊड/पिकात कठाळ्या घुसघुसला
केळीचं घडघड/पानांची गडबड/भुंगा गं कमळ गुंगगुंगला
देठाची झडझड/मिरचीची पडपड/मधीच डिंगऱ्या डिंगडिंगला
डोहात बुडबुड/थंडीनं थुडथुड/झिंगा गं पाण्यात झिंगझिंगला
झाडं झिम्म झिम्माड/मनकवडं मन्नडं/राजबिंडि मुखुटा गुदगुदला
फेट्याची फडफड/ऊसात खडबडं/मागमूस जागीच मुसमुसला
पधराची सडसड/उरात धडधड/गावभर बोभाटा ऊठऊठला
****
तळटीप : वसंत मुरदारे सरांचा पुढचा कविता संग्रह आर्थिक कारणास्तव अजूनही प्रकाशित झाला नाही.'खानदानी कविता' हे त्याचे शीर्षक आहे. 'साहित्याक्षर 'च्या वतीने तो लौकरच प्रकाशित करण्याचा मानस आहे. सदर कवितांची वही गेली अनेक वर्षे संपादकांकडे पडून आहे..

महाराष्ट्राच्या गावागावात वसंत मुरदारे सरांसारखे आणिक प्रतिभासंपन्न माणसे आहेत की जी खऱ्या अर्थाने माय मराठीला समृद्ध करत आहेत. त्यांचे साहित्य जसे एकदा गावाने छापून आणलं तसंच इतर साहित्यिकांची ही जबाबदारी आहे की त्यांच्या उत्तमोत्तम कवितांचा संग्रह सर्वांनी मिळून प्रकाशित करावा. वसंत मुरदारे सरांची जुना कष्टाचा म्हातारा बैल मेला ही कविता अत्यंत आवडली. सध्याच्या समाज व्यवस्थेतील वास्तव अत्यंत भेदक पणे त्यामध्ये आलेले आहे. अगदी अस्सल कवी चा बाणा जपणारी अस्सल कविता आहे.
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंखूपच छान ! उपजत प्रतिभेने ओथंबलेल्या कविता वाचनात आल्या . कविला सन्मान मिळाला नाही ही मात्र शोकांतिकाच ......
जवाब देंहटाएंThanks. Please follow the blog
हटाएंफार सुंदर कविता. साध्या सोप्या शब्दात आशयभरला आहे. ओळीत ठेका लय असल्यामुळे वाचता वाचताच आपणही ताल धरतो. लखलखीत सत्य त्यांच्या शब्दा शब्दात उतरले आहे. तुकारामाचे वारस शोभावेत असं शब्द लावण्य. त्यांची कविता अजुनही जिवंत आहे, वाचनीय आहे. अस्सल कवीला याहून मोठा कुठला पुरस्कार हवा असतो. कवीला शतशः प्रणाम.
जवाब देंहटाएंधन्यवाद
हटाएंतेच लोक होते....त्यांच्या गोड बोलण्यात शिव्याशाप होते.... शिवायचेही पैसे....अशी समाजाची खोली रुंदी मोजत अंतर्मुख करणारी कविता आणि तुझी सय आली लय वा-याची होऊन हे भावतरल सौंदर्य मांडणारी कविता.... झाडं झिम्म झिम्माड मनकवडं मन्नड..सारखी तालबद्ध निसर्ग कविता... वा,क्या बात..अप्रतिम👌💐
जवाब देंहटाएंप्रतिभावान परंतु अलक्षित कवीची माहिती आपल्या लेखामुळे मिळाली
जवाब देंहटाएंवर्तमानातील वास्तव चित्रण हेच कवी वसंत मुरदारे यांच्या कवितेचा आत्मा आहे. ढोंगी वास्तवतेवर आसूड उगारणाऱ्या अशा सोप्या शब्दातील आशयसंपन्न मनाला भिडणाऱ्या त्यांच्या कविता आहेत. अशा अस्सल कवीची दखल घेऊन डॉ. संजय बोरुडे सरांनी त्यांचा काव्याविष्कार समोर आणला. त्यांची कविता वर्तमान अस्तित्वाच्या जिवंत घटनांचे, घडामोडीचे प्रतिनिधित्व करते. कवीला मानाचा मुजरा.... 🙏
जवाब देंहटाएंSundar
जवाब देंहटाएंअप्रतिम.. उपेक्षित कवीची तन्मयतेने घेतलेली दखल कौतुकास्पदच ...!👌👌👌💐💐
जवाब देंहटाएंGreat,...वसंत मुरदारे सरांच्या प्रतिभेस सलाम.
जवाब देंहटाएंप्रतिष्ठित आणि प्रस्थापितांच्या कळपाबाहेर राहून, स्वतःचं वेगळंपण जपणाऱ्या वसंत मुरदारे यांची कविता अस्सल जीवनानुभव मांडणारीआहे.कवीचं अवलीया असणं परिचित करून दिलं.धन्यवाद!
जवाब देंहटाएंकवी वसंत मुरदारे यांचे काव्य लेखन समाजाभिमुख आहे.
जवाब देंहटाएं*तेच लोक होते*कविता ढोंगी लोकांचा करा चेहरा दाखवते.कवीची शब्दसंपदा समृद्ध असून,कविता सकस आहेत.
सरांच्या कविता समाजाचे वास्तव दर्शन घालणारे आहे.....सरांच्या पुढील कविता संग्रहास खूप खूप शुभेच्छा ,आर्थिक विवंचनेने ग्रासलेल्या कवी चा कविता संग्रह साहित्याक्षर प्रकाशित करीत आहे....👌👌👍👍💐💐
जवाब देंहटाएंGood n inspiring
जवाब देंहटाएंGood n inspiring
जवाब देंहटाएं